वैराग – वैराग, ता. बार्शी येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय बांधण्यासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास अखेर मंजुरी मिळाली आहे. गट क्रमांक ४२२ मधील एकूण ४ हेक्टर ४५ आर क्षेत्रापैकी २ हेक्टर ४५ आर जमीन आगाऊ ताब्याने प्रदान करण्याच्या प्रस्तावाला कार्योत्तर मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार दिलीप सोपल यांनी दिली आहे.
“गेल्या अनेक वर्षांपासून मी आणि सामाजिक कार्यकर्ते अमरराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून आम्ही यासंदर्भात सातत्याने शासन दरबारी प्रयत्नशील होतो. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख डॉ. ओम प्रकाश शेटे यांचे विशेष सहकार्य लाभले,” असे आमदार सोपल यांनी नमूद केले.
>
महत्वाचे तपशील:
* जमिनीचा तपशील: वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर येथील शासकीय गट क्र. ४२२/दोन (एकूण क्षेत्र ४ हेक्टर ४५ आर) पैकी २ हेक्टर ४५ आर जमीन.
* प्रयोजन: ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय बांधकाम करणे.
* शासन आदेश: महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने ८ डिसेंबर २०२५ रोजी शासन आदेश कार्यान्वित केला.
* मंजुरी: जिल्हा शल्य चिकित्सक, सोलापूर यांना सदर जमीन महसूल मुक्त, भोगवटा मूल्यविरहित किमतीने कब्जा हक्काने प्रदान करण्यास कार्योत्तर मंजुरी देण्यात आली आहे.
* कायदेशीर तरतुदी: महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४० आणि महसूल वन विभिनियम १९७१ मधील नियम ५-६ मधील तरतुदीनुसार ही जमीन मंजूर करण्यात आली आहे.
लवकरात लवकर रुग्णालयाचे बांधकाम: आमदार सोपल यांचा आग्रह
या मंजुरीसोबतच आमदार सोपल यांनी एक महत्त्वाची अट पूर्ण करण्याची आवश्यकता सांगितली आहे. सदर जागेवरील बगीचा आरक्षणामध्ये बदल करून ते ग्रामीण रुग्णालयाच्या प्रयोजनासाठी वापरण्यास नगरपरिषद वैराग यांनी नगर विकास विभागाची मान्यता घेणे आवश्यक आहे.
पुढील पाऊले:
आमदार सोपल यांनी सांगितले की, या संदर्भात लवकरात लवकर जिल्हाधिकारी यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेऊन तातडीने पुढील पाऊले उचलण्यासंदर्भात आपण आग्रही राहणार आहोत. हे ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे यासाठी शासन स्तरावर आमचे प्रयत्न सुरू आहेत.
वैराग परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही मंजुरी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.























