सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेकडील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाप्रमाणे महागाई भत्ता मिळत नाही. सोलापूर महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्याने अडचणी येत आहेत. यामुळे नगर विकास विभागाने सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दरमहा सुमारे 10 कोटी रुपये विशेष निधी द्यावा या मागणीचे निवेदन धर्मवीर शहर व शहर हद्दवाढ कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मल्लिकार्जुन हुणजे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर दौऱ्यावर आले असताना “धर्मवीर” संघटनेच्या वतीने त्यांना हे निवेदन देण्यात आले. सोलापुरात धर्मवीर कर्मचारी संघटनेसह विविध संघटनांच्या वतीने महापालिका कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात येत आहे. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण पत्र देण्यात आले, अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मल्लिकार्जुन हुणजे यांनी दिली.
सोलापूर महानगरपालिकेकडील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाप्रमाणे महागाई भत्ता मिळत नाही. त्यामुळे वारंवार प्रशासनाकडे संघटनेच्या मार्फत शासनाप्रमाणे महागाई भत्ता देणे बाबत निवेदन दिलेलो आहेत. महापालिका प्रशासनाकडे पैसे नसल्यामुळे महागाई भत्ता देऊ शकत नाहीत, अशी अडचण सांगण्यात येते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांसाठी विशेष निधी म्हणून कमीत कमी दरमहा 8 ते 10 कोटी मंजुर करुन सोलापूर महानगरपालिकेकडे वितरीत करावा. तसे आदेश नगरविकास विभागास द्यावेत, असे धर्मवीर कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मल्लिकार्जुन हुणजे यांनी या निवेदनात म्हटले आहे.






















