———————-
सोलापूर – सेवासदन कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर येथे आयोजित सेवासदन कला कौमुदी युवती महोत्सवांतर्गत डॉजबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. दयानंद महाविद्यालयाचे माजी शारीरिक शिक्षण संचालक प्रा. प्रकाश भोसले यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
*मान्यवरांची उपस्थिती*
या उद्घाटन सोहळ्याला सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाचे शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर, सेवासदन संस्थेच्या सचिव प्रा. वीणा पतकी, कार्यकारीणी सदस्य. पद्माकर कुलकर्णी, क्रीडा संघटना अध्यक्ष दशरथ गुरव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी, पर्यवेक्षक प्रा. पद्मकुमार उपाध्ये, प्रा. मधुरा गोगटे, कार्याध्यक्ष प्रा. सुवर्णा अवधानी आणि क्रीडा शिक्षिका प्रा. आरती मलजी आदी मान्यवर उपस्थित होते.
या डॉजबॉल क्रीडा स्पर्धेत शालेय आणि महाविद्यालयीन गट मिळून एकूण १४ संघांनी सहभाग घेतला आहे. या संघांमध्ये प्रचंड उत्साह संचारलेला दिसत होता.
उद्घाटन सोहळ्याची रंगत वाढवण्यासाठी सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतावर बहारदार नृत्य सादर केले. त्यांच्या आकर्षक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
अतिशय उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात या डॉजबॉल स्पर्धेला सुरुवात झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सविता मादळे यांनी केले.

























