तभा फ्लॅश न्यूज : छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती शाहू महाराज यांचे भोकरदन तालुक्यातील पारध येथे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासंदर्भात ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या दालनात बैठक पार पडली असून, १० दिवसांत जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. भोकरदन तालुक्यातील पारध येथे थोरले छत्रपती शाहू महाराजांनी पहिली लढाई लढून जिंकल्यानंतर तेथे बराच काळ वास्तव्य केले होते. या ऐतिहासिक घटनेची आठवण जपण्यासाठी आणि मराठ्यांचा देदीप्यम इतिहात भावी पिढीला कळावा यासाठी आ. संतोष पाटील दानवे (पंचायत राज कमिटी अध्यक्ष) यांनी मागणी केली होती. त्या अनुषंगाने हे स्मारक उभारण्यात येणार आहे.
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे आणि स्वयम सामाजिक संस्थेने या स्मारकाची संकल्पना मांडली होती. यासाठी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे आणि बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सविता शालगर यांनी पारध येथे जागेची पाहणी केली होती. स्मारकासाठी ५ एकर जागा आवश्यक असून, प्राथमिक आढावा घेतल्यानंतर ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालयात जयकुमार गोरे व पंचायत राज कमिटी अध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत सुधीर थोरात, रवींद्र सासमकर, जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जयकुमार गोरे यांनी स्मारकाला प्राथमिक मंजुरी देत, १० दिवसांत अधिकाऱ्यांसोबत जागेची पाहणी करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
१५ कोटी खर्च अपेक्षित
थोरले शाहू महाराजांच्या पारध येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकासाठी १५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचा अंदाज जिल्हा परिषदेने व्यक्त केला आहे. शासनाने यासाठी आर्किटेक्ट नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत.दोन जागांची पाहणी या स्मारक निर्मितीसाठी गत आठवड्यात दोन संभाव्य जागांची पाहणी केली होती. पहिली जागा पारध येथील जुन्या पराशर मुनी मंदिर परिसर असून, दुसरी जागा छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील तपासणी नाका आहे. हेरिटेज विभाग यापैकी कोणत्या जागेला पसंती देतो, यावर स्मारकाची जागा निश्चित होईल.
आ.संतोष पाटील दानवे (पंचायत राज कमिटी अध्यक्ष)
येथे होऊ घातलेले छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक हे केवळ पारधच्या वैभवात भर घालणारे नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही गौरवाची बाब आहे. पारध (शाहूराजे) या गावची केवळ एक विशेषता नसून पौराणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जनत करणारे गाव म्हणून पारधची अवघ्या महाराष्ट्राला ओळख आहे.
रवींद्र सासमकर : राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर
आमदार संतोष पाटील दानवे यांचा आग्रही पाठपुरावा आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे व स्वयम सामाजिक संस्था यांच्या संकल्पनेतून होणारे हे स्मारक तालुक्याला नवी ओळख देणारे ठरेल. याबाबत आमदार संतोष पाटील दानवे यांचे विशेष प्रयत्न सुरु आहेत. तसेच स्थानिक ग्राम पंचायत कार्यालय आणि पारध ग्रामस्थ यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
सागर देशमुख ( ग्रामस्थ ,पारध)
छत्रपती शाहू महाराजांचा आमच्या पारद नगरीला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे पारध हे गाव महाराजांच्या नावाने ओळखले जाते. पारध येथे छत्रपती थोरले शाहू महाराज त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येत असल्यामुळे आणि याचा पाठपुरावा पंचायतराज कमिटीचे अध्यक्ष आ. संतोष पाटील दानवे यांनी केला त्यामुळे पूर्ण पारध गावाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे.