सोलापूर : आयडियल स्कूलमध्ये शालेय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ आज दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव सर व सोलापूरची सुवर्णकन्या वेगवान धावपटू पूजा राठोड उपस्थित होते. शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सचिन चव्हाण सर व सचिवा सौ. ज्योती चव्हाण आणि मुख्याध्यापिका उर्मिला कटप यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
२ डिसेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धांमध्ये कबड्डी, थ्रोबॉल, रस्सीखेच, व्हॉलीबॉल थ्रोबॉल मैदानी, लंगडी, संगीत खुर्ची अशा विविध खेळांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा भावनेची जोपासना करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
मनोगत व्यक्त करताना शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री.सचिन चव्हाण यांनी भाषणात पूजा राठोड यांच्या संघर्षमय क्रीडा प्रवासाचा आढावा घेत त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना खेळातून शाळेचे नाव उज्ज्वल करण्याचे मार्गदर्शन करत भविष्यात आवश्यक त्या मदतीचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सत्येन जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर राहून मैदानावर उतरून शारीरिक आरोग्य सुदृढ ठेवण्याचे आवाहन केले. सुवर्णकन्या पूजा राठोड यांनी आपल्या मनोगतात शंभर मीटर धावण्यात फक्त 0.05 मायक्रो सेकंदांनी झालेल्या पराभवाचा उल्लेख करत त्यातून मिळालेला धडा सांगितला व गोल्ड मेडल मिळवण्यासाठी केलेल्या कठोर सरावाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेचे नियोजन व मार्गदर्शन करण्यात क्रीडा शिक्षक रवींद्र चव्हाण सर व रविराज माने सर यांचे विशेष योगदान राहिले. विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे स्पर्धा अधिक रंगतदार होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

























