आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची डॉ माशेलकराशी ग्रेट भेट
भोई प्रतिष्ठान ने पुण्यजागर नाव सार्थ केले
डॉ. रघुनाथ माशेलकर
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यां समोर माशेलकरांनी उलगडले बालपण..
अर्धापूर दि २३(प्रतिनिधी)
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी गेली आठ वर्षे सुरू असलेला भोई प्रतिष्ठानचा पुण्यजागर प्रकल्प हा या चिमुकल्यांच्या जीवनातील आशेचा किरण असून या मुलांचे भवितव्य घडवण्यात हा प्रकल्प दिशादर्शक ठरला आहे .असे प्रतिपादन जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले .अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी भोई प्रतिष्ठान चे वतीने राबवण्यात येत असलेल्या शैक्षणिक पालकत्व योजने अंतर्गत या चिमुकल्यांशी डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी पुण्यात संवाद साधला. त्यावेळेस ते बोलत होते.
मुलांसोबत गप्पा मारत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना माशेलकर सरांनी दिलखुलास उत्तरे दिली .
तुम्ही अभ्यास कसा केला ,तुमचे शिक्षण किती झाले, तुम्ही या वयात पण एवढे काम कसे काय करू शकता …इथपासून तर तुम्ही पण शाळेत दंगामस्ती केली होती का ? असे अनेक प्रश्न या चिमुकल्यांनी माशेलकरांनी विचारले. या सर्वांची उत्तरे देताना आपले बालपण, शिक्षणासाठीचा संघर्ष आणि आईने केलेले संस्कार या गोष्टींविषयी दिलखुलास संवाद साधला.
आईने प्रेरणा दिली
डॉ माशेलकर म्हणाले की,माझे वडील लहानपणीच गेले .आई अशिक्षित होती पण तिने मला शिकण्यासाठी प्रेरणा दिली. त्यामुळे कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता जिद्द, परिश्रम, प्रामाणिकपणा या गोष्टी नी तुम्ही सुद्धा जगाला गवसणी घालू शकता .तुमच्यातून भविष्यामध्ये पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न नक्की घडतील असा मला विश्वास आहे आणि भोई प्रतिष्ठानच्या या वाटचालीत मी सदैव तुमच्या सोबत आहे असे म्हणतात मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला .साहित्य, संस्कृती ,विज्ञान या विषयावर सरांनी याप्रसंगी मुलांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शिक्षण तज्ञ सौ अरचीता मडके,अस्तित्व गुरुकुल, वीर संचालिका गीतांजली देगावकर, पल्लवी वाघ, सामाजिक कार्यकर्त्या सोनल कोद्रे ,सुप्रसिद्ध लेखक सागर देशपांडे , शिक्षण तज्ञ अच्युत सोमण आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे संयोजक, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पुण्यजागर प्रकल्पाचे समन्वयक डॉ.मिलिंद भोई यांनी कार्यक्रमाचे आयोजनामाची भूमिका स्पष्ट करताना या चिमुकल्यांच्या जीवन प्रवासात आनंदाची काही वळणे निर्माण व्हावीत त्यासाठी भोई प्रतिष्ठान ने सुरू केलेल्या शिक्षण सेवा प्रकल्पात माशेलकरांचे मार्गदर्शन, त्यांचा मिळालेला आशीर्वाद हा क्षण आमच्या साठी दीपस्तंभा सारखा आहे आशा भावना डॉ भोई यांनी व्यक्त केल्या.
आम्ही अभ्यास करून मोठे होणार, एवढी मोठी व्यक्ती आम्हाला भेटून आशीर्वाद देते आहे हा आमच्यासाठी स्वप्नवत क्षण असू दिलेल्या आशीर्वादामुळे आम्ही आता खूप खूप अभ्यास करून मोठे होऊन दाखवू अशी भावना या प्रकल्पातील विद्यार्थिनी अंबिका क्षीरसागर हिने व्यक्त करतात माशेलकर सरांच्या च्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले . या कार्यक्रमाचे संयोजन सुपरमाइंड संस्था, अस्तित्व गुरुकुल, अर्धापूर तालुका मराठी पत्रकार संघ, श्री अशोक दोरुगडे,श्री प्रमोद परदेशी यांनी केले.


















