सांगोला – तालुक्यातील वासुद हे माण नदीकाठी वसलेले छोटेसे गाव आज वृक्षसंवर्धनाच्या कार्यामुळे संपूर्ण परिसरासाठी प्रेरणास्थान ठरत आहे. गावातील तरुण, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि परदेशी स्थायिक झालेले गावकरी यांनी मिळून तब्बल १ हजार ३०० झाडे लावून ती यशस्वीपणे जगवण्याचा संकल्प पूर्ण केला आहे.
गावातील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी अंत्यविधीसाठी गेलेल्या तरुणांना स्मशानभूमीत एकही झाड नसल्याची जाणीव झाली. त्या क्षणीच त्यांनी ठरवले गाव हिरवागार करायचा आणि झाडे फक्त लावायची नाहीत, तर जगवायची ! गावभर हरित क्रांती या संकल्पातून सुरू झालेले वृक्षारोपण आज गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात फुलले आहे. वासुद ते सांगोला रोड, अकोला रोड, सूतगिरणी रोड, केदारवाडी रोड, सातकी रोड तसेच मंदिर परिसर, शाळा, गावठाण जिथे जागा दिसेल तिथे फळझाडे, फुलझाडे आणि सावली देणारी झाडे लावण्यात आली आहेत. या उपक्रमात प्रत्येक घटकाचा मोलाचा वाटा आहे त्यामध्ये ग्रामपंचायत व विकास सोसायटी, तरुण मंडळे, हनुमान विद्यालय वासुद येथील विद्यार्थी, जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थी गावातील महिला व ज्येष्ठ नागरिक यांचा तसेच गावापासून दूर पुणे, मुंबई, दिल्ली येथे असलेले अधिकारी व उद्योजक यांनी सुद्धा आर्थिक मदत करत सहभाग नोंदविला. फक्त लागवड न करता जोपासना करत दर आठवड्याला टँकरने पाणीपुरवठा तसेच काही शेतकऱ्यांकडून ड्रिप सिंचन व तरुणांकडून नियमित देखभाल करत आहेत. आज एप्रिलच्या कडक उन्हात जेव्हा माणूस, जनावरे आणि पक्षी या झाडांच्या सावलीत निवारा घेतात तेव्हा या उपक्रमाचे खरे महत्त्व जाणवत आहे. “झाडे लावा आणि झाडे जगवा” हा संदेश वासुद गावाने या कृतीतून दिला आहे.

























