सोलापूर : आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या २३१ व्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा आवारात सोलापूर महानगरपालिका आणि
क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे मध्यवर्ती जयंती महोत्सव मंडळ यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी सोलापूर महापालिका अतिरिक्त आयुक्त विणा पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मध्यवर्ती मंडळाचे संस्थापक सुरेश पाटोळे , मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष खंडू आप्पा बनसोडे ,किशोर जाधव, भिमराव गायकवाड, कामगार कल्याण अधिकारी अजित खानसोळे, विभागीय अधिकारी जावेद पानगल, रोहन कामने,बापू गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. सोलापूर महापालिकेचे कर्मचारी राजाराम भोसले, रमेश चव्हाण, उद्यान विभागाचे यल्लाप्पा पुजारी यांचा विशेष गौरव करण्यात आला. प्रास्ताविक मध्यवर्तीचे संस्थापक सुरेश पाटोळे यांनी केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त विणा पवार म्हणाल्या, “महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत आपली पुतणी सत्यशोधक मुक्ता साळवे हिला लहुजींनी प्रवेशित केले. मुक्ता साळवे हिने चौथीच्या वर्गात शिक्षण घेत असताना एक निबंध लिहिला. या निबंधात मुक्ताने प्रस्थापित धर्म व्यवस्थेतील अनाचार, विषमता, दांभिकपणा उघड केला. आमच्या अस्पृश्यांचा धर्म कोणता? असा प्रश्न निबंधात उपस्थित केला.
मुक्ता साळवे हिने लिहलेला निबंध म्हणजे लहुजी साळवे यांच्या संस्काराचे लिखित रूप आहे.आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा विचार आज जयंतीदिनी आपण साऱ्यांनी आचरणात आणला पाहिजे’.


















