सांगोला – शनिवार दि.१८ ऑक्टोंबर रोजी सांगोल्यातील माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी आ.डॉ.बाबासाहेब देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, शिक्षणाधिकारी कादर शेख, सांगोला पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सहा.पोलीस निरीक्षक सचिन जगताप, तहसीलदार संतोष कणसे, मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, विस्ताराधिकारी अमोल भंडारी, केंद्रप्रमुख असलम इनामदार, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी अभिजीत मौलाने, माजी केंद्रप्रमुख ईश्वर भोसले, पत्रकार मोहन मस्के, इंजि.श्रीकांत भोसले, संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉ.संजीवनी केळकर, डॉ.रणजीत केळकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून झाली. प्रास्ताविकातून नीलिमा कुलकर्णी यांनी माता व बालक यांचा विकास घडवून आणणारी तसेच मन, मनगट व मेंदूचा विकास करून आवश्यक ती जीवन कौशल्य विकसित करणारी उत्कर्ष शाळा असल्याचे नमूद केले. मंत्री जयकुमार गोरे यांनी मनोगतातून संस्थेच्या कार्याचा उल्लेख करताना डॉ.संजीवनी केळकर यांना प्रतिकूल परिस्थितीत सेवाभावाने जीवन समर्पित करणारी माऊली असे गौरवोउद्गार काढले. संस्थेच्या कार्याचा उल्लेख करताना कोणतीही साधनशक्ती नसताना प्रचंड मेहनत व त्याग कामाची तळमळ व अखंड तपश्चर्या करून सेवाभावी संस्थेचे व्हिजन पूर्ण केले असे नमूद केले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे येथील मुकुंद कुलकर्णी यांनी मनोगतातून शिक्षकांप्रति आदरभाव व्यक्त करून स्वदेशीचा वापर करून पर्यावरणाचे संरक्षण, वृक्ष लागवड इत्यादी चळवळींच्या माध्यमातून नागरी शिष्टाचारांचे पालन केले तर देश प्रगतीपथावर जातो असे प्रतिपादन केले. यावेळी आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा नीलिमा कुलकर्णी, सचिवा वसुंधरा कुलकर्णी, कोषाध्यक्षा डॉ.शालिनी कुलकर्णी, संस्थेचे पदाधिकारी, तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अश्विनी कुलकर्णी यांनी केले.