सोलापूर : महापालिकेच्या कौन्सिल हॉलसमोर गुढीपाडव्याच्या निमित्ताने पारंपरिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात गुढी उभारणी कार्यक्रम पार पडला. स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्या हस्ते विधिवत गुढी उभारून मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
पारंपरिक वेशभूषा, सणाचा उत्साह आणि उपस्थित नगरसेविका आणि महिलांच्या सहभागामुळे परिसरात आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी बोलताना उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर म्हणाल्या की, गुढीपाडवा हा सण नवचैतन्य, नवउमेद आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा आहे. नववर्षाच्या निमित्ताने सोलापूर शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असून, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. त्यांनी सर्व सोलापूरकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी आपल्या मनोगतात गुढीपाडव्याचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, हा सण परंपरा, संस्कृती आणि एकात्मतेचे प्रतीक आहे. या सणातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास महापालिकेतील नगरसेविका, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

























