जेऊर – शेटफळ (ता.करमाळा) येथे झालेल्या शिवारफेरी कार्यक्रमात जळगाव येथील केळी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ , कृषी विभागातील अधिकारी, केळी निर्यातदार व प्रगतशील शेतकऱ्यांकडून केळी उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी करमाळा माढा माळशिरस पंढरपूर व परांडा तालुक्यातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती
सोलापूर जिल्ह्यातील निर्यातक्षम केळी उत्पादक शेतकरी ग्रुप व ऊस उद्दिष्ट शंभर प्लस शेतकरी ग्रुपच्या वतीने शेटफळ तालुका करमाळा येथे शेतकऱ्यांसाठी शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते या शिवाय फेरीमध्ये जळगाव येथील केळी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ अरुण भोसले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की केळी पिकामध्ये येऊ घातलेल्या पनामा सारख्या असाध्य रोगाला टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीचे आरोग्य सुधारण्याची व पिकाची फेरपालट करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी केळी पिकामध्ये होत असलेल्या नवनवीन संशोधनाची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. यावेळी बोलताना कुर्डूवाडी माढा विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे म्हणाले की सध्या केळीला मिळत असलेल्या कमी दरामुळे शेतकरी अडचणीत आहे भविष्यात शेतकऱ्यांनी आपल्या केळी पिकाच्या लागवडीचे योग्य नियोजन करण्याची गरज असून आपल्या उपलब्ध क्षेत्रांमध्ये एकच पीक न घेता इतर वेगवेगळ्या पिकाची लागवड करून आपले होणारे नुकसान टाळले पाहिजे.
केळी निर्यातदार किरण डोके म्हणाले की दर्जात्मक केळी निर्यातीला कायम मागणी राहणार आहे परंतु शेतकऱ्यांनी पिकाचा दर्जा सुधारण्यावर भर दिला पाहिजे.
जैन इरिगेशनचे किरण पाटील म्हणाले की निर्यातक्षम व दर्जेदार उत्पादनासाठी केळी पिकाचे खत पाणी याचे सुक्ष्म व योग्य नियोजन करून मातीच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे .कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कारप्राप्त शेतकरी सोमनाथ हुलगे यांनी शेतकऱ्यांनी खोडवा केळी सुद्धा निर्यात झाली पाहिजे या दृष्टीने लागवड पूर्व मशागती पासूनच काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले यावेळी प्रगतशील शेतकरी अंगद पाटील नवनाथ पोळ उत्कर्ष देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रगतशील शेतकरी विजय लबडे ,विलास लबडे, अशोक लबडे कैलास लबडे व प्रतापसिंह लबडे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र पोळ यांनी केले तर आभार चंद्रकांत लबडे यांनी मानले या कार्यक्रमाला मंडल कृषी अधिकारी मधुकर मारकड , लोकविकास फार्मर प्रोड्युसर कंपनीचे वैभव पोळ नानासाहेब साळुंके, प्रशांत नाईकनवरे, विष्णू पोळ, रोहित लबडे,चिखलठाण येथील प्रगतशील शेतकरी ॲड दिगंबर साळुंके, भाऊसाहेब सरडे,वांगी येथील नितीन तकिक, सोमनाथ गव्हाणे, सचिन गव्हाणे, राजेंद्र कोळेकर आण्णा कदम यांच्यासह या परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























