सोलापूर : नुकत्याच घोषित झालेल्या एमपीएससी परीक्षेच्या निकालात सोलापूरची आरती परमेश्वर जाधव ही राज्यात मुलींमध्ये पहिली आली आहे. तिने उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे.
आरतीचे वडील परमेश्वर उर्फ वामन मालबा जाधव (मु.हिपळे,ता. द.सोलापूर ) हे गवळी म्हणून दूध संकलन करुन कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. परमेश्वर हे वामन गवळी म्हणून ओळखले जातात. त्यांनी अत्यंत संघर्ष करुन 1990 दशकांत वाणिज्य शाखेची पदवी मिळवली आणि एमपीएससी साठी प्रयत्न केले पण वामन जाधव हे एमपीएससी परीक्षेत केवळ एका मार्काने अपयशी ठरले होते. तेव्हा त्यांनी दूध व्यवसाय करून आपलं स्वप्न आपल्या पुढच्या पिढीत रुजवलं.भाऊ महावीर मालबा जाधव याला आधी पीएसआय केलं.
त्यानंतर मुलगा विनायक वामन जाधव (बीडीओ) याला एमपीएससीत यशस्वी होण्यासाठी पाठबळ दिलं अन् आता मुलगी आरतीने उपजिल्हाधिकारी पोस्ट काढून आपल्या वडिलांच्या अपूर्ण स्वप्नाला यशाचं कोंदण लावलं. ती सध्या नागपूरला मुख्याधिकारी म्हणून प्रशिक्षण पूर्ण करत आहे.




















