सोलापूर – हरिपाठ परिवाराचा तृतीय वर्धापन दिन सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मोतीबिंदू तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेते ज्ञानेश्वर सपाटे यांच्या शुभहस्ते पार पडले.
हरिपाठ परिवाराच्या माध्यमातून सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये महिला भजनी मंडळांसाठी मोफत वारकरी पाऊल प्रशिक्षण सुरू असून, तिसऱ्या वर्षात पदार्पण करताना बळीराम जांभळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दहा शाखांतील सुमारे २०० महिलांचा परिचय मेळावा आयोजित करण्यात आला. यात स्वागत नगर, अशोक चौक, लष्कर, हनुमान मंदिर टाकळीकर मंगल कार्यालय, बाळे डुमणे नगर, अवंती नगर आदी शाखांचा सहभाग होता. या मेळाव्यात तिळगुळ वाटप व हळदीकुंकवाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात हरिभक्तिपरायण सुधाकर इंगळे महाराज यांनी वारकरी संप्रदायातील हरिपाठाचे महत्त्व विशद केले. तर सीए राजगोपाल मनियार यांनी अयोध्या व श्रीराम मंदिराचे महात्म्य भाविकांना समजावून सांगितले. संत सावता माळी वारकरी मृदंग वादन प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी संगीत परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी ३० नागरिकांची मोतीबिंदू तपासणी करण्यात आली असून, मोफत शस्त्रक्रियेसाठी शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय, बाळे यांचे सहकार्य लाभणार आहे. कार्यक्रमात विविध महिला भाविकांनी आपली मनोगते व्यक्त केली.हरिपाठ परिवाराच्या माध्यमातून शहरातील महिला भजनी मंडळांना मोफत हरिपाठ पाऊल प्रशिक्षण देण्याची प्रतिज्ञा बळीराम जांभळे यांनी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिकेत जांभळे, अविराज जांभळे, अंजली लोखंडे व तुकाराम लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
















