सोलापूर – श्री दत्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट येथे ज्योतिबा मंडपमध्ये हरिपाठ परिवाराच्यावतीने १७५ महिलांच्या वतीने हरीपाठाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी वटवृक्ष मंदिराचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे सचिव मोरे, भाजप नेते व माजी नगरसेवक दिलीप कोल्हे आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, बळीराम जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली हरिपाठ व श्री संत सावता महाराज वारकरी मृदंग वादन प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी यांच्या माध्यमातून हा धार्मिक कार्यक्रम संपन्न करण्यात आला. श्री संत सावता महाराज वारकरी मृदंग वादन प्रशिक्षण संस्थेच्या बालकलाकारांनी गवळण सादरीकरण करून जल्लोषामध्ये वारकरी पाऊल खेळत हरिपाठ संपन्न केला.
हरिपाठ परिवाराच्या राजस्व नगर शाखा, टाकळीकर मंगल कार्यालय जुळे सोलापूर शाखा, संत गोरोबाकाका लष्कर भजनी मंडळ शाखा, लष्कर महादेव मंदिर शाखा, बाबुराव सातारकर भजनी मंडळ जुनी पोलीस लाईन, निराळे वस्ती हरिपाठ यांच्या माध्यमातून हा उपक्रम पूर्ण केला. याप्रसंगी हिंदू रक्षक मित्र मंडळाचे शेखर फंड, महेश कुलकर्णी, उपस्थित होते. तर अविराज जांभळे, अनिकेत जांभळे, तुकाराम लोखंडे, गुरुनाथ ताटे, स्वाती मोरे, अंजली लोखंडे, यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.















