सोलापूर – ‘शिवयोगी सिध्देश्वर महाराज की जय’, ‘हर्र बोला हर्र…’ ‘गणपती बप्पा मोरया’ या जयघोषात सिध्देश्वर महाराज यांनी स्थापन केलेल्या अष्टविनायक गणपती पूजनाने सिध्देश्वर यात्रेस सुरुवात झाली. सोलापूरच्या आठ दिशेला आठ गणपती असून, प्रत्येक ठिकाणी आरती करून पूजा करण्याची प्रथा आहे. साधारण ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी सात तास लागतात. २१ किलोमीटरचे अंतर आहे. आजचा योग म्हणजे मंगळवार अंगारकी चतुर्थीचा. अष्टविनायक गणपतीची महापूजा झाली. सिध्देश्वर यात्रा मुख्य सोहळा १२ जानेवारीपासून आहे. शुभकार्याची सुरुवात गणपती पूजनाने करण्याची पध्दत आहे. त्यानुसार दरवर्षी गणपती महापूजा करूनच यात्रेला सुरुवात होते. सकाळी दहाला मल्लिकार्जुन मंदिरात पंच कमिटी सदस्यांनी महापूजा केली. यानंतर – पोगूल मळा येथील पहिल्या गणपतीची महापूजा करीत आठही गणपतीची पूजा झाली. शिवानुभव मंगल कार्यालयात आठव्या गणपतीची आरती झाली. पुन्हा मल्लिकार्जुन मंदिरात आरती झाल्यानंतर रात्री साडेसातला कार्यक्रमाचा समारोप झाला. याप्रसंगी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीची चेअरमन धर्मराज काडादी, पुष्कराज काडादी, नीलकंठप्पा कोनापुरे, विश्वनाथ लब्बा, सिध्दाराम पाच्छापुरे, विलास कारभारी यांच्यासह मान्यवर सदस्य यात सहभागी झाले होते.
कोट
शुभ कार्याची सुरुवात गणपती पूजनाने
सिध्देश्वर महाराज यांनी स्थापन केलेल्या अष्टविनायक गणपती पूजनाने यात्रेला सुरुवात झाली. कधीही सोलापूरवर विघ्न व आपती येऊ नये म्हणून ही पूजा करण्याची परंपरा आहे. वीरेश गणपती, कुंभारी येथून सकाळी साडेदहाला सुरुवात झाली. प्रत्येक ठिकाणी अष्टविनायक स्तोत्र, अथर्वशीर्ष पठण, आरती झाली. आठही दिशेला आठ गणतीचे धार्मिक महत्व आहे. भक्तांचे संरक्षण व मनोकामना पूर्ण होतात.
शिवयोगी शास्त्री, होळीमठ, पुरोहित
चौकट
या ठिकाणी आहेत अष्टविनायक
१- घुळी महांकाळ गणपती, रेवणसिध्देश्वर मंदिर
२- वीरेश गणपती, कुंभारी रोड
३-बेनक गणपती, होटगी-यत्नाळ रोड
४-करी गणपती, देगाव रोड
५- वीर गणपती, सम्राट चौक
६- वीर कोलाहाल, भोगावजवळ
७-मश्रूम गणपती, तळेहिप्परगा
७-कामेश्वर अतिथी गणपती, शिवानुभव मंगल कार्यालय
















