बाशी – कश्मीर ते कन्याकुमारी (४२५० किमी) ही अतिदुर्गम आणि आव्हानात्मक सायकल रॅली अवघ्या १६ दिवसांत यशस्वीरित्या पूर्ण करणारे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील हवालदार अमृत रोहिदास खेडकर यांचा प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, बार्शी सेवा केंद्रात गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
सेवा केंद्र संचालिका संगीतादिदी यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला. कार्यक्रमास ब्र. कु. निशादिदी, खेडकर यांची मातोश्री शोभा खेडकर तसेच नातलग दत्तात्रय थोरात व जयश्री थोरात उपस्थित होते.
सत्कार प्रसंगी अमृत खेडकर यांनी मनोगत व्यक्त करताना संपूर्ण रॅलीतील सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे रोमांचकारी अनुभव, वाटेत आलेली आव्हाने, त्यावर मात करत पुढे जाण्याची जिद्द तसेच या प्रवासादरम्यान मिळालेली अमूल्य प्रेरणा यांचा विशेष उल्लेख केला.
रॅलीत सहभागासाठी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेले प्रोत्साहन, मार्गदर्शन व रॅलीनंतर व्यक्त केलेले कौतुक हे स्वतःसाठी उर्जादायी ठरल्याचे त्यांनी सांगितले.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयासारख्या आध्यात्मिक वातावरणात माझा सत्कार होत असल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
संगीतादिदींनी अमृत खेडकर यांच्या अतूट चिकाटी, नियमित परिश्रम व आत्मविश्वासाचे विशेष कौतुक केले. शिस्त, निष्ठा आणि सातत्य यामुळेच ते अशा कठीण रॅलीत यशस्वी ठरले, अशी प्रशंसात्मक भावना व्यक्त करुन दिदींनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले.
हवालदार अमृत खेडकर यांच्या या कामगिरीमुळे संपूर्ण सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा आणि जिल्ह्याचा गौरव वाढला असून, त्यांच्या कार्यातून युवकांसाठी प्रेरणादायी असा सुंदर संदेश मिळतो.
























