तभा फ्लॅश न्यूज/वाशी : वाशी तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. शेतकरी, नागरिकांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतात सर्वत्र पाणीच पाणी असून काही गावाला जोडणारे पूल वाहून गेले आहेत. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मागील आठवड्यात राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पावसाने झालेल्या नुकसानीचा तालुक्यात पाहणी दौरा केला.
यादरम्यान सरसकट पंचनाम्याच्या सूचना त्यांनी दिले, मात्र प्रशासनाकडून पंचनामे कासव गतीने सुरू आहेत. तालुक्यात अतिवृष्टीमुळे ऊस, केळी, मका, सोयाबीन, उडीद, मूग, तूर पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतात पाणी साचल्याने पिके सडून जाऊ लागली आहेत. खता औषध दुकानदारांची उधारी, पेरणीसाठी खाजगी सावकाराचे घेतलेले पैसे, बँकांचे पीक कर्ज, मूलबाळांचा शिक्षणाचा खर्च आता कसा करावा म्हणत अतिवृष्टीमुळे उभं पीक डोळ्यासमोर पाण्यामध्ये सडून जात असल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
लहान लेकराप्रमाणे पिकांना जपलं आणि निसर्गानं तोंडचा घास हिसकावून नेला म्हणत नुकसान ग्रस्त शेतकरी टाहो फोडत आहेत. शेतकरी मदतीची मागणी करत आहेत. तालुका प्रशासन आणि कृषी विभाग नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहे.
नुसते फोटो काढून पंचनामे होणार की प्रत्यक्षात मदत मिळणार याकडे बळीराजाच्या नजरा लागल्या आहेत. पावसाने झालेल्या नुकसानीची तात्काळ मदत द्यावी अन सरसकट पीककर्ज माफ करावं अशी मागणी बळीराजा शासन, प्रशासनाकडे करत आहे. वाशी तालुक्यातील तेरखेडा, कडकनाथवाडी, घोडकी, दसमेगाव, जुन्नर या शिवारात प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली.
थेट शेतात शिरून तालुक्याचे तहसीलदार प्रकाश मेहत्रे, तालुका कृषी अधिकारी राजाराम बर्वे यांनी पिकांची पाहणी केली. त्यांच्यासोबत गावचे कृषी सहाय्यक धनेश यादव, तलाठी प्रवीण पालखे, मंडळ अधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे कधी पूर्ण होणार आणि बळीराजाला कधी मदत मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत