सांगोला – धायटी (ता.सांगोला) येथील बालम काळे हे ऊसतोडीसाठी बाहेरगावी गेले असता त्यांच्या घराला रविवार दि.१६ नोव्हेंबर रोजी दुपारी अचानक आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, कपडे आदी जळून खाक झाले. त्यांना रात्रीच्या वेळी अंथरूण-पांघरूनही नाही असे समजल्यानंतर सांगोल्यातील आपुलकी प्रतिष्ठानने तातडीची मदत म्हणून ९ ब्लॅंकेट, ५ सतरंज्या, ६ टॉवेल आणि ७ साड्यांची मदत रविवारी रात्रीच पोच केली.
सोमवार दि.१७ नोव्हेंबर रोजी सकाळी किराणा माल व संसारोपयोगी साहित्य देऊन मदत करण्यात आली. यावेळी धायटी येथील ग्रामस्थ त्याचबरोबर आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, महादेव दिवटे, डॉ.शिवराज भोसले, अमर कुलकर्णी उपस्थित होते.


















