केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सशुल्क मासिक पाळी रजा धोरणाबद्दल केलेल्या विधानानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया समोर आल्या. अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
बॉक्स ऑफिसवर ‘अॅनिमल’, ‘सॅम बहादूर’, ‘सालार, ‘डंकी’सारखे हिंदी चित्रपट प्रदर्शित झालेले असताना दिग्दर्शक-अभिनेता हेमंत ढोमेचा ‘झिम्मा २’ चांगली कमाई करत आहे. करोना काळानंतर प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’च्या पहिल्या भागाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते आणि ‘झिम्मा २’नेही प्रेक्षकांच्या मनात जागा केली. या दरम्यान सिनेमातील कलाकारांच्या मुलाखती चर्चेत आल्या आहेत. दरम्यान हेमंतने एका मुलाखतीमध्ये मासिक पाळीविषयी भाष्य केले होते. केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांच्या विधानानंतर हेमंतची प्रतिक्रिया समोर आली होती. ‘सशुल्क (भरपगारी) मासिक पाळी रजा धोरणा’ला विरोध करत स्मृती इराणी राज्यसभेत असं म्हणाल्या होत्या की, ‘एक मासिक पाळी येणारी स्त्री म्हणून मी सांगू इच्छिते, की मासिक पाळी म्हणजे काही दिव्यांगत्व नाही. हा स्त्रियांच्या जीवन प्रवासाचा एक नैसर्गिक भाग आहे. स्त्रियांना समान संधी नाकारल्या जातील, अशा गोष्टी आपण मांडू नयेत.’ त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया समोर आल्या, काहींनी त्यांचा विरोध केला तर काहींनी समर्थन केले होते. आता हेमंतची प्रतिक्रिया विशेष चर्चेत आली आहे. त्याने टीव्ही९ मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेता हेमंत ढोमे म्हणाला की, ‘आपले आजी-आजोबा पूर्वीपासून घरातील महिलांना असे म्हणायचे की ४ दिवस देवघरात जायचे नाही किंवा स्वयंपाकघरात जायचे नाही. याचा अर्थ अस्पृश्य म्हणून नाही. यामागे अतिशय माणुसकीचं काम होतं. देवघरात जायचं म्हणजे, खूप देव पूजावे लागायचे, प्रचंड काम असायचं. तर या चार दिवसांमध्ये थकवा नको म्हणून जाऊ दिलं जायचं नाही. स्वयंपाकघरातही काम असल्याने जाऊ नकोस असं सांगायचे. मात्र आता त्याचा वेगळा अर्थ काढला गेला आहे की, या चार दिवसात देवाला हात लावायचा नाही. मात्र ही गोष्ट अशी नव्हती.’
अभिनेता पुढे म्हणाला की, ‘मला असं वाटतं की असं म्हणू नये की हे काय अपंगत्व नाहीये. मला असं वाटतं की, ही एक शारीरीक गोष्ट आहे आणि त्याचा आदर आपण सर्वांनी ठेवला पाहिजे. आज माझ्यासोबत डिरेक्शन-प्रोडक्शन टीमध्ये काम करणाऱ्या महिला मला हक्काने मेसेज करू शकतात. त्या कधी-कधी मला थेट सांगतही नाहीत, पण मला कळतं आणि मी त्यांना सांगतो की तीन दिवस येऊ नका. हे इतकं छान आहे आणि ते इतकं छान राहिलं पाहिजे. माझं असं मत आहे की त्या दिवसात शारिरीक विश्रांती मिळणं गरजेचं आहे.’ हेमंतने दिलेल्या या प्रतिक्रियेचं सोशल मीडियावर विशेषत: स्त्रीवर्गाकडून कौतुक होते आहे.