वेळापूर – हाथी घोडा पालखी | जय बोलो भाईनाथ की ॥ असा भाईनामाचा जयघोष करीत हजारो भाविकांनी प.पू.सद्गुरू डॉ.भाईनाथ महाराज कारखानीस यांचा १२० वा जन्मोत्सव मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात साजरा केला. यानिमित्त भव्य दिंडी मिरवणुकही काढण्यात आली.
वेळापूर येथील श्री आनंदमूर्ती भजनी मंडळ व वेळापूर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने प.पू.सद्गुरू डॉ.भाईनाथ महाराज कारखानीस यांचा १२० वा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
सकाळी ९.३० वाजता आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली. यावेळी
सतीशराव माने देशमुख, अमृतराज माने देशमुख, धनंजय माने देशमुख, सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच नाना मुंगुसकर, शंकरराव काकुळे, हनुमंत साळुंखे यांच्यासह वेळापूर व परिसरातील भाविक उपस्थित होते.
मिरवणुकीच्या अग्रभागी दसूर येथील रेणुका सनई, चौघडा, डफडी पथक, भाळवणी येथील दिंडी पथक वेळापूर येथील भजनी मंडळ, श्रीराम महिला मंडळ, वारकरी पथक, वारकरी दिंडी, पालखी व रथ असा वैभवी लवाजमा होता. यामध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते. खंडोबा मंदिरापासून निघालेला हा पालखी, रथ सोहळा अर्धनारी नटेश्वर मंदिर, पालखी चौक, एस.टी.बस स्टँड, मुस्लीम समाज गल्ली, हरीसाहेब वाडामार्गे मुख्य पेठेत आला. तेथून तो दुपारी २:०० वाजता मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचला. दिंडी मार्गावर भाविकांनी सडा, रांगोळ्या घातल्या होत्या. घरावर गुढ्या उभा करण्यात आल्या होत्या.
पालखी चौक व्यापारी मंडळ, सिद्धीविनायक गणेशोत्सव मंडळ, एस.टी.स्टँड व्यापारी मंडळ, मुस्लीम समाज, आनंदमूर्ती पतसंस्था, नवतरूण गणेशोत्सव मंडळ, सुरभी पतसंस्था, लोकविकास पतसंस्था आदिंच्यावतीने भाविकांना चहा, फराळ, केळी, सरबत आदिंचे वाटप करण्यात आले होते.
जन्मोत्सव साजरा
शनिवारी प पु सद्गुरु भाईनाथ महाराज कारखानीस यांच्या जन्मोत्सवानिमित्त ह भ प स्वामीराज महाराज भिसे यांनी कीर्तनाची सेवा केली. रात्रौ.१०.२५ वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत भाईनाथ महाराज की जय या नामाचा जयघोष करीत १२० वा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
शनिवार दि.१६ रोजी सकाळी ९.३० वाजता ह.भ.प. प्रदीप महाराज ढेरे यांचे काल्याचे किर्तन झाले. दुपारी आरतीनंतर महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.


















