पंढरपूर – पंढरपूर नगरपरिषदेच्या २०२५ च्या निवडणूकीचे पडघम सध्या वाजु लागलेले आहेत. निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. एकीकडे पालिका निवडणूकीची धामधुम सुरु असली तरी पंढरपूर नगरपरिषदेच्या स्थापने पासूनचा आज पर्यंतचा इतिहास बऱ्याच पंढरपूरकर नागरिकांना तसेच नवीन मतदारांना माहित नाही. पालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासा मध्ये कोणीकोणी चेअरमन, नगराध्यक्षपद भूषविले, पहिल्या महिला नगराध्यक्षा कोण ठरल्या, सर्वात जास्त नगराध्यक्षपदाची धुरा कोणी सांभाळली या सर्व माहितीसाठी सोलापूर तरुण भारत कडून खास करण्यात आला आहे हा बाबतीचा प्रपंच.
पंढरपूर नगरपालिकेची स्थापना १८८२ मध्ये झाली असून सध्याच्या २०२५ पर्यंतच्या १४३ वर्षाच्या या कार्यकाळा मध्ये पालिकेचे अध्यक्ष, कमीशनर, प्रभारी अध्यक्ष तसेच प्रशासक म्हणून तब्बल ९४ जणांनी पालिकेच्या कारभाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली होती. या मध्ये १८८६ पासून ते १९२५ या काळा मध्ये रामचंद्र नारायण करंदीकर, जी.बी. धायगुडे एच.टी. कवठेकर यांनी कमिशनर म्हणून तर बी.आर.हेबळीकर, जी.ई.स्कॉट यांनी (अध्यक्ष) म्हणून तर एम.टी.चिपळूणकर, व्ही.एम. खोपकर, जी.व्ही.काळे यांनी (चेअरमन) आणि व्ही.टी.काळे, व्ही.के. नामजोशी, जी.आर.केसकर, व्ही.बी.काणे आणि अकबरअली अब्दुलहुसैन यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले होते.
सन १९२५ पासून पुढे डी.टी.आराध्ये, आर.एन.पुरंदरे, जी.बी.वालावलकर, जी.बी.राजोपाध्ये, बी.जे.बुरजे, जी.एस.अभंगराव,आर.जी.काळे, एन.एन. मांगले, एम.जे.भिंगे, एस.जे.भिंगे, पां.तु.उत्पात, एम.ए.मुळे यांनी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्या नंतर सन १९८५ ते १९९१ या काळात बाळासाहेब डोंबे, आर.के.कांबळे, नारायण धोत्रे, प्र.कृ.देशमुख, अरविंद देवडीकर, सुनील पाटील, अरविंद जाधव, सुभाष भोसले, प्रभाकर अधटराव यांनी नगराध्यक्षपद भूषविले.
तत्कालीन आमदार सुधाकर परिचारकांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मीनारायण भट्टड यांनी १९९१ ते १९९६ असे सलग पाच वर्षे नगराध्यक्षपदावर काम केले. त्या नंतर भागवताचार्य वा.ना.उत्पात, दगडूशेठ घोडके यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाला नंतर राजश्री गंगेकर या पहिल्या महिला नगराध्यक्षा म्हणून नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्या. तेथून पुढे सुरेखा दिलीप पवार यांनी आणि २००१ मध्ये जनते मधुन नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूकी मध्ये सुनीता साळुंखे या विजयी झाल्या. २००१ ते २००६ हा पाच वर्षाचा कार्यकाल त्यांनी पुर्ण केला. त्या नंतर २००६ नंतरच्या पाच वर्षाच्या काळात लक्ष्मण शिरसट, दगडू धोत्रे, सतीश मुळे, पांडुरंग वामन बंदपट्टे यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली.
सन २०११ मध्ये झालेल्या निवडणूकीत परिचारक गटाचा पराभव होवून पालिकेत सत्तांतर झाले. आमदार भारत भालके गटाच्या ताब्यात पालिकेची सत्ता गेली. त्या वेळी उज्वला भालेराव यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली. अडीच वर्षाच्या कार्यकाळा नंतर झालेल्या सत्तांतरा पासून ते गेल्या नगरपालिका निवडणूकी मध्ये जनते मधुन परिचारक गटाकडून साधना भोसले या नगराध्यक्षपदाच्या सर्वसाधारण जागेवर निवडून आल्या होत्या.
———————–
आठ वर्षे परिचारकांनी आणि साडेसात वर्षे भोसलेंनी सांभाळली नगराध्यक्षपदाची धुरा –
पंढरपूर नगरपरिषदेच्या स्थापने पासून ते आज पर्यंतच्या १४३ वर्षाच्या कार्यकाळा मध्ये सलग आठ वर्षे नगराध्यक्षपद भूषविण्याचा पहिल्यांदा मान जी.बी.परिचारक यांना मिळाला होता. त्या नंतर तब्बल ८३ वर्षांनी माजी नगराध्यक्षा साधना भोसले यांना सलग साडेसात वर्षे नगराध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला आहे. यंदा देखील नगराध्यक्षपदाच्या शर्यंती मध्ये त्या आहेत. त्यांनी देखील भाजपाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा नगराध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची संधी मिळते का ? हे येत्या एक, दोन दिवसांमध्ये स्पष्ट होईल. जर त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्या विजयी झाल्या तर सलगच्या नगराध्यक्षपदाच्या त्यांच्या रेर्कार्ड मध्ये निश्चितच पुन्हा भर पडू शकणार आहे.
———————–
पहिल्या महिला नगराध्यक्षा गंगेकर –
पंढरपूर नगरपालिकेची स्थापना १८८२ मध्ये झाली. त्या वेळी तुकाराम रामचंद्र कवठेकर यांनी नगरपालिकेचे पहिले अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. त्या नंतर पहिल्या महिला नगराध्यक्षा होण्याचा मान १९९७ मध्ये राजश्री गंगेकर यांनी मिळविला होता. पालिकेच्या स्थापने पासूनच्या आज पर्यंतच्या कार्यकाळा मध्ये राजश्री गंगेकर, सुरेखा पवार, सुनिता साळुंखे, उज्वला भालेराव आणि साधना भोसले या पाच महिलांनाच नगराध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला आहे.
———————–
प्रशासकांच्या ताब्यात पालिकेचा कारभार –
पंढरपूर पालिकेवर डी.एस.भिंगे यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाल वगळता सन १९७७ते १९८५ या काळात जे.पी. बुधवंत, आय.सी.पाटील, रमनाथ झा, श्री.के.वनपाल, डी.एस.पवार आणि एम.रामास्वामी यांनी प्रशासक म्हणून पालिकेचे काम पाहिले होते.
———————–
सर्वात जास्त वेळा भूषविले नगराध्यक्षपद –
पंढरपूर नगरपालिके मध्ये जी.बी. परिचारक यांनी सन १९२५ ते १९३३ आणि १९३७ ते १९३९ आणि पुन्हा १९५७ ते १९५८ असे एकुण अकरा वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्या नंतर अॅड.बी.जी. भादुले यांनी १९४९ ते १९५० आणि १९५१ ते १९५७ असे सात वर्षे तर ए.एच.कवठेकर यांनी टप्प्या टप्प्याने प्रत्येकी सहा वर्षे नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती.





















