सोलापूर – मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपरिषद निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील त्यांचे पुत्र बाळराजे पाटील आणि अजिंक्यराणा पाटील यांनी अनगरमध्ये हुकुमशाही पद्धतीने निवडणूक लढली आणि जिंकली आहे. या निवडणुकीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाहीचा खून झाला आहे. हिटलरशाहीच्या विजयानंतर उन्मादात जल्लोष करताना पाटलांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकेरी उल्लेख करून हिणंवले आहे. ज्या पवार कुटुंबीयांमुळे तुम्ही मोठे झालात. त्याच पवार कुटुंबियांवर शिंतोडे उडवता. धिक्कार असो धिक्कार असो अनगरकरांचा धिक्कार असो, अरे या पाटलाचे करायचं काय ? खाली डोकं वर पाय अशा तीव्र घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने शहराच्या हुतात्मा चौक येथे आंदोलन करण्यात आले. बॅनरवर माजी आमदार राजन पाटील, बाळराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटील यांचे पोस्टर लावून त्यावर फुली मारण्यात आली. तसेच त्यांच्या घोटाळेबाज कार्याचा लेखाजोखा बॅनरवर मांडला होता.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर प्रवक्ते सुहास कदम यांनी अनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीवर भाष्य करताना, ज्या पवार कुटुंबीयांमुळे आमदार झालात. त्याच कुटुंबीयांचा अपमान करता. असंख्य घोटाळे मोहोळमध्ये केले. शासनाच्या जमिनी लाटल्या. खुनासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. तरी ही निवडणूक हिटलरशाही पद्धतीने पार पाडली गेली. यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाहीचा खून झाल्याचा आरोप केला. यावेळी शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.




















