वाशिंबे – तालुका करमाळा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी जनतेमधून माजी आमदार संजयमामा शिंदे समर्थक तानाजी झोळ हे कार्यरत असून त्यांचे विरुद्ध नवनाथ मधुकर झोळ यांनी तीन अपत्य असल्यामुळे तानाजी झोळ यांचे सरपंच पद रद्द करण्यात यावे असा अर्ज जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे दिलेला होता यामध्ये ग्रामविकास अधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आले होते.
दरम्यान या प्रकरणात न्याय निवाडा करताना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १४-१ ज-१ अन्वये मा. जिल्हाधिकारी यांनी दिनांक १७/१२/२०२५ रोजी पारित करण्यात आलेल्या आदेशानुसार नवनाथ मधुकर झोळ यांचा अर्ज नामंजूर करण्यात आल्यामुळे तानाजी झोळ यांचे सरपंच पद अबाधित राहिले आहे. संबंधित निकालाची प्रत तहसीलदार करमाळा यांना पाठविण्यात आली आहे.
गावाच्या विकास कामांचा विजय _ तानाजी झोळ
वाशिंबे ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून भरघोस मताने मी विजय झाल्यानंतर कोणतेही राजकारण न करता गावाच्या विकासासाठी तत्कालीन आमदार व सध्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून भरघोस निधी उपलब्ध करून घेतला. गावाचा विकास हाच आपला ध्यास असल्यामुळे माझ्याविरुद्ध विरोधकांनी दाखल केलेले अपील नामंजूर करण्यात आले हा विकास कामांचा विजय असल्याची भावना तानाजी झोळ यांनी बोलून दाखविली.
येथून पुढच्या काळामध्ये आपण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार ,पालकमंत्री जयकुमारजी गोरे , अक्कलकोटचे आमदार सचिनजी कल्याण शेट्टी, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली अधिकाधिक निधी उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले


















