सोलापूर : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून सन्मान बहुउद्देशीय सामाजिक संस्था, आंबेडकर गृहनिर्माण संस्था यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना “सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार २०२६” प्रदान करून गौरविण्यात आले.
संस्थेच्या संस्थापिका प्राचार्या डॉ. मीना गायकवाड यांच्या पुढाकारातून हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. यावर्षी डॉ. ज्योत्सना कोरे, वंदना कुलकर्णी, दिपाली भडकुंभे, कल्पना पोतन आणि उज्वला कटारे या पाच कर्तृत्ववान महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नवनिर्वाचित नगरसेविका संगीता शंकर जाधव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी मीनाक्षी पेठे व सहाय्यक धर्मादाय उपायुक्त संजय पाईकराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. मीना गायकवाड यांनी वर्षभर संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देत उपस्थितांचे स्वागत केले.
सूत्रसंचालन वंदना वाघमारे व प्रा. वैभव दुड्याल यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव प्रा. डॉ. डी. आर. गायकवाड यांनी मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी मेलडी बिट्स म्युझिक अकॅडमीच्या वतीने हिंदी व मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये दत्ता भडकुंभे, विकास सुरवसे, सुशील गायकवाड, सिद्धार्थ जाधव, रमेश बनसोडे, राम कांबळे, मनोज शिंदे, साहिल भंडारे, ऐजाज शेख, अतिश इंगळे, किरण उडानशीव, संजीवनी सिदगणे व वंदना वाघमारे यांनी सुरेल गीतांनी उपस्थितांचे मनोरंजन केले.
























