माढा : शासनाकडून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याचा निर्णय घेण्यात आला १ एप्रिल २०१९ पासून वाहन खरेदी केले असेल तर त्या वाहनाला ही नंबर प्लेट येत. परंतु यापूर्वी देखील वाहन खरेदी केली असेल तर त्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही नंबर प्लेट बसवण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार वाहनधारक नंबर प्लेट बसून घेत आहेत.
माढा शहरात ही नंबर प्लेट बसवण्याची सुविधा नसल्याने माढा शहर व परिसरातील गावच्या नागरिकांना कुर्डूवाडी किंवा अकलूज या ठिकाणी नंबर प्लेट बसवण्यासाठी जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांचा नाहक वेळ व पैसे खर्च होत होते. ही गोष्ट लक्षात घेऊन माढा शहर मनसे अध्यक्ष समाधान सुतार यांनी अकलूज परिवहन उपकेंद्राला या संदर्भात निवेदन दिले होते.
अकलूज उपकेंद्र परिवहन विभागाने त्या निवेदनाची दखल घेऊन एफटीए एचएसआरपी सोलुशन कंपनीला पत्र पाठवून माढा शहरात तत्काळ नंबर प्लेट केंद्र सुरू करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे लवकरच माढा शहरात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट केंद्र सुरू होऊन वाहनधारकांची नंबर प्लेट बसवण्याची सोय होणार आहे.
अकलूज येथे परिवहन विभागाला निवेदन देताना मनसे शहराध्यक्ष समाधान सुतार,शंकर मदने,दादा भांगे उपस्थित होते.



















