जेऊर – छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत आयोजित ‘समाधान शिबिर’ उमरड ता.करमाळा येथे आयोजित करण्यात आले. या शिबिरास लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. प्रशासनाला थेट जनतेच्या दारापर्यंत जाता यावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. उमरड मंडळ येथे आयोजित या शिबिरामध्ये अनेक लोकांनी आपली प्रशासकीय कामे एकाच छताखाली पूर्ण करून घेतली.
या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांचे हस्ते करण्यात आले यावेळी आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन वामनराव बदे, आदिनाथ कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम, मकाई कारखान्याचे संचालक बापूराव चोरमले, उमरड चे सरपंच प्रमोद बदे, अंजनडोह अरुण शेळके,मा.सरपंच संदिप मारकड, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विशेष सहाय्य योजनेअंतर्गत मंजूर योजनांचे प्रमाणपत्र, व बेबी किट चे लाभार्थ्यांना वाटण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांनी शिबिराच्या आयोजनाचा हेतू सांगून लोकांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.
आदिनाथ कारखान्याचे संचालक राजभाऊ कदम यांनी हे शिबिर सर्वसामान्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे सांगितले आदिनाथचे संचालक वामनराव बदे यांनी उमरड मंडळामध्ये शिबिराचे आयोजन केल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले. कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक नंदकिशोर वलटे यांनी केले.
विविध विभागातील विभाग प्रमुखांनी आपल्या योजनांची तसेच या शिबिरात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती उमरड मंडळातील सर्व नागरिकांना दिली . प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये या संपूर्ण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये महसूल विभागामार्फत संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. महसूल विभागाने उत्पन्न दाखले, जात अधिवास, नॉन क्रिमिलियर अल्पभूधारक असल्याचे दाखले सातबारा उतारे, फेरफार नोंदी रेशन कार्ड संबंधीची कामे जागेवरच पूर्ण करून दिली.
कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कृषीयंत्रिकीकरण अंतर्गत अनुदानाची माहिती सिंचन योजनांची माहिती पिक विमा शेतकरी महासन्माननिधी पाणी याबरोबरच तांत्रिक अडचणी दूर करून दिल्या.
आरोग्य विभागात आयुष्यमान भारत कार्ड आबा कार्ड यांची नोंदणी करण्यात आली तसेच मोफत आरोग्य तपासणी लसीकरण व जननी सुरक्षा योजनेची ही माहिती देण्यात आली. आरोग्य कार्डची वाट पहिली या विभागाच्या मार्फत करण्यात आले.
महिला व बालकल्याण विभागामार्फत विविध शिष्यवृत्तीची माहिती संबंधित पालक व विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सवलती मागासकीय वर्गीय विद्यार्थ्यांसाठीचे दाखले तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी सहाय्यभूत साधनांचे वाटप व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या विभागामार्फत लाडकी बहीण योजना आणि इतर महिला सक्षमीकरणांचे योजनांची माहिती व कागदपत्रांचे वाटप करण्यात आले.
पुरवठा विभागामार्फत लोकांच्या रेशन कार्ड संदर्भातील अडचणी दूर करण्यात आल्या रेशन कार्ड मधील दुरुस्त्या, नवीन नावे दाखल करणे व काही नावे वगळणे हे कार्य जागेवरच करण्यात आले.
पंचायत समिती व जिल्हा परिषद मार्फत लोकांच्या अनेक अडचणी दूर करण्यात आल्या यात घरकुल संबंधीची माहिती लोकांना देण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेची माहिती तसेच यादीतील नाव तपासणी करण्यात आली. स्वच्छता, रोजगार यासंदर्भात विविध योजनांची माहिती व दाखल्यांची वाटप करण्यात आले.
पशुसंवर्धन विभागामार्फत दुभत्या जनावरांचे लसीकरण, औषध वाटप व गोठा बांधणीचे अनुदान या संदर्भात माहिती तसेच कागदपत्रांचे वाटप करण्यात आले.
भूमी अभिलेख विभागामध्ये अनेक लोकांची गर्दी पाहायला मिळाली. जमिनीची मोजणी आणि नकाशाशी संबंधित तक्रारींचे निवारण या विभागामार्फत करण्यात आले. यात ई मोजणी अर्जांची प्रक्रिया समजावून सांगणे, जुने नकाशे उपलब्ध करून देणे आणि पोट हिस्सा मोजणी बाबतचे मार्गदर्शन करण्यात आले.
सेतू विभागाच्या माध्यमातून विविध शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले तसेच इकेवायसी विभागातून विविध योजनांच्या केवायसी करण्यात आल्या.
महावितरण विभागाचे कर्मचारीही या शिबिरामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी विजपुरवठा आणि वीज बिलांच्या तक्रारींचे निराकरण केले यात घरगुती आणि शेती पंपासाठी वीज जोडणीचे अर्ज तसेच चुकीच्या वीज बिलांची दुरुस्ती व सौर कृषी पंप योजनेची माहिती लोकांना देण्यात आली.
राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी या शिबिरात सहभागी झाले होते त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या सवलतींची माहिती लोकांना दिली वयानुसार विविध योजनांमध्ये लाभ घेऊ शकणाऱ्या नागरिकांना दाखले वाटप करण्यात आले.
नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत लोकांना मार्गदर्शन करण्यात आले या शिबिरामध्ये जयश्री सलगर यांच्या चाट मसाला स्टॉल व शिवरत्न महिला समूहाचा क्लिनिंग मटेरियल स्टॉल उभारण्यात आला होता.
हे संपूर्ण शिबिर व्यवस्थित पार पाडण्यासाठी महसूल चे सर्व कर्मचारी तसेच उमरड मंडळातील युवा वर्ग यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
चौकट 1
“छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियान अंतर्गत आयोजित समाधान शिबिरात आज उमरड मंडळामध्ये अनेक लोकांनी सहभाग घ्यावा प्रशासनाचे विविध विभाग आज या ठिकाणी उपस्थित असून नागरिकांना एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ घेता यावा व प्रशासनाला थेट जनतेच्या दारापर्यंत नेणारा हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला जात आहे लोकांनी समाधान शिबिरात सहभागी होऊन आपली प्रशासकीय कामे पूर्ण करून घ्यावीत”.
– शिल्पा ठोकडे
तहसीलदार करमाळा
चौकट दोन-
शिबिरातील सहभागी विभाग व लाभार्थी संख्या-
आरोग्य विभाग 116,कृषी 63 ,भूमि अभिलेख 11 ,गॅस विभाग 25, पुरवठा विभाग 170, सेतू विभाग 50 ,पंचायत समिती व जिल्हा परिषद विभाग 62, उमरड महसूल मंडळ 249 ,आधार कार्ड दुरुस्ती विभाग 60 ,एनसीएमसी कार्ड 52, पशुसंवर्धन विभाग 63


























