सोलापूर : भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता समस्त मानवांच्याच्या उत्थानासाठी आहे. भगवतगीतेतील सखोल ज्ञानामुळेच मनुष्य कल्याण शक्य आहे, असे प्रतिपादन ज्ञानेश्वरीचे ज्येष्ठ उपासक व प्रवचनकार ह.भ.प. श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांनी हेरिटेज लॉन्स येथील तीन दिवसीय ‘वाग्यज्ञ’ ला बुधवारी प्रारंभ करताना केले.
यंदाच्यावर्षी ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर ‘म्हणोनि जेथ श्री श्रीमंतु (कर्तुत्व आणि कृपा) या श्री ज्ञानेश्वरीतील १८ व्या अध्यायातील ओवीवर सलग तीन दिवस प्रवचन करत आहेत. बुधवारी प्रारंभी दीपप्रज्वलनाने ‘वाग्यज्ञा’ चे उद्घाटन झाले. याप्रसंगी व्यासपीठावर विकास सहकारी बँकेचे अध्यक्ष कमलकिशोर राठी, ज्येष्ठ संचालक राजगोपाल मिणियार, राजगोपाल चांडक, हरीनिवास जाजू, पांडुरंग मंत्री, मनीष बलदवा, ज्योती आसावा, प्रवीण बजाज, सुनील माहेश्वरी यांची उपस्थिती होती.
ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले, “जो व्यक्ती विचार करून बोलतो, तो भक्त असतो आणि जो केवळ ऐकून बोलतो, तो श्रोता. संशय निर्मितीबद्दल बोलताना त्यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्यांच्या मते, ज्ञान आणि अज्ञानामुळेच संशय निर्माण झाला पाहिजे. भगवद्गीता ऐकल्यानंतर केवळ अर्जुनाच्या मनात संशय निर्माण झाला, कारण त्याला आत्मिक ज्ञान मिळवायचे होते. याउलट, धृतराष्ट्र आणि संजय यांच्या मनात संशय आला नाही. अज्ञानातून निर्माण झालेला मोह अज्ञान दूर झाल्यावरच नष्ट होतो आणि अंतःकरणातील मोह व संशय निघून गेल्यावरच जीवनाचे कल्याण होते, असेही महाराजांनी सांगितले.
देगलूरकर महाराजांनी गीतेच्या पहिल्या श्लोकाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, गीतेचा पहिला श्लोक धृतराष्ट्राच्या मुखातून आला, जो गीतेचे सार ‘कुरुक्षेत्र’ आणि ‘धर्मक्षेत्र’ या दोन शब्दांत सांगतो. यात आपण जीवनात कोणते कर्तृत्व गाजवले पाहिजे, याचा उल्लेख आहे. संजयसाठी देखील हाच उपदेश आहे. महाराजांनी यावर जोर दिला की, धर्मक्षेत्रे व कुरुक्षेत्रे या शब्दांवरच गीता संपली आहे.
संपूर्ण गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतःची भूमिका ओळखून धर्ममार्ग ओळखण्याची आणि त्याचे पालन करण्याची सूचना केली. “माझे चांगले व्हावे, मलाच ज्ञान मिळावे, हे चांगले लक्षण नाही. आपला धर्म नक्की काय आहे हे ओळखण्याची गरज आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. संजयच्या एका श्लोकात संपूर्ण गीतेचे तत्त्वज्ञान
व्यासांनी दिलेल्या वरदानामुळे संजयने धृतराष्ट्राला सर्व काही जसेच्या तसे सांगितले. तरीही सैन्यसंख्या आणि कर्तृत्वाच्या बळावर धृतराष्ट्राला कौरव विजयी होतील, असे वाटत होते. जेव्हा धृतराष्ट्राने याबाबत संजयला विचारणा केली, तेव्हा संजयने “जिकडे योगेश्वर श्रीकृष्ण आणि धनुर्धर अर्जुन आहेत, तिकडे विजय निश्चित आहे,” असे ठामपणे सांगितले.
महाराजांनी उल्लेख केला की, संजयच्या मुखातील हा एक ओळीचा श्लोक संपूर्ण गीतेतील तत्त्वज्ञान सांगून जातो.
सव्वा लाख श्लोकांचे सार केवळ ३२ अक्षरात सांगणे, ही संत श्री ज्ञानेश्वरांनी संजयला दिलेली एकप्रकारे शाबासकी आहे, असे महाराजांनी नमूद केले. विस्तारापेक्षा संकोचाला बुद्धी अधिक लागते. म्हणूनच कमी बोलणाऱ्याला जगात महत्त्व आणि त्यांच्या बोलण्याला वजन असते, हे देखील महाराजांनी जाणवून दिले.
याप्रसंगी विकास बँकेचे कर्मचारी वर्ग व नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन संजीव कुसुरकर यांनी केले.
सोलापूरकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर यांचे रसाळ वाणीतून होणारे प्रवचन गुरुवारी आणि शुक्रवारी दररोज सायंकाळी ६.३० वाजता गांधीनगर येथील हेरिटेज लॉन्स येथे होणार असून सोलापूरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विकास सहकारी बँकेतर्फे करण्यात आले आहे.

















