सोलापूर – जिल्ह्यातील शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील माजी आमदारांनी बुधवारी सकाळी मुंबई येथील भाजप कार्यालयात पक्षप्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर राजन पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करताना, अजित पवार यांनी आपल्या सोबत लबाड माणसं ठेवली. पक्षात मान राहिला नाही. त्यांच्यामुळे आम्हाला पक्ष सोडावा, लागत असल्याचा आरोप मुंबई येथे केला होता. दरम्यान, त्या आरोपाला प्रत्युत्तर देताना उमेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजन पाटील तसेच माजी आमदार यशवंत माने यांच्यावर देखील घणाघात हल्ला केला. राजन पाटील आणि यशवंत माने यांना मोहोळ तालुक्याने नाकारले आहे. अशा विद्वान महापुरुषांना भाजपने आपल्या पक्षात घेतले आहे. शिव्यांची लाखोळी वाहणाऱ्या विद्वानांना राजन पाटलांना भाजपने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे प्राचार्य करावे. त्यांच्या प्रवेशानंतर भाजपचे काय होईल, याची मला भीती वाटत असल्याचा खोचक टोला देखील उमेश पाटील यांनी यावेळी लगावला.
पुढे ते म्हणाले, भाजपने आपल्या पक्षात महापुरुष घेतला आहे. तब्बल चार वर्षांपासून त्यांचे भाजप प्रवेशाचे प्रयत्न सुरू होते. आमदार सचिन कल्याणशेट्टीमुळे त्यांच्या पक्षप्रवेशाला आज मुहूर्त मिळाला. त्यांच्यासोबत माजी आमदार यशवंत माने यांनी देखील भाजपची वाट धरली. माने हे इंदापूरचे व्यावसायिक आहेत. माने यांना त्यांच्याच इंदापूर तालुक्यात फारसे महत्व नाही. आम्ही त्यांना आमदार म्हणून निवडून आणल्यामुळे ते आमदार झाले. त्यांच्या इंदापूर तालुक्यामध्ये काही कंपन्या आहेत. त्या कंपनीच्या बाबतीत प्रश्न निर्माण झाल्याने त्याची सोडवणूक करण्यासाठी ते भाजपाध्ये प्रवेश करत आहेत. वास्तविक पाहता त्यांचे फारसे राजकीय वजन तालुक्यात किंवा जिल्ह्यात नाहीत. यशवंत माने हे ठेकेदार व्यक्ती, मोहोळ तालुक्याचा ठेका पाटील यांनी माने यांना दिला. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर मोहोळ तालुका ठेकामुक्त झाला आहे.
अशी सडकून टीका पाटील यांनी यशवंत माने यांच्यावर केली.
विधानसभा निवडणुकीतच ते बॅकफूटवर गेले.
संपूर्ण जिल्हा प्रशासन ताब्यात असताना सरकारचा पाठिंबा असताना अफाट पैसा असताना मोहोळ तालुक्याने त्यांना पाडले. मोहोळ तालुक्याच्या लोकांनी त्यांना नाकारले. मतदार पुरोगामी विचारसरणीचे आहेत. भाजप पक्ष प्रवेश जनतेला मान्य नाही. पाटील हे विधानसभा निवडणुकीतच बॅकफुटवर गेले आहेत. त्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी नाही.
धक्कातंत्र वापरून आम्ही देखील भाजपचे नेते फोडू.
पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत माजी पक्ष बदलण्याचा राजकारणावर चर्चा झाली. गेल्या आठ दिवसापासून राज्यात आणि सोलापूर जिल्ह्यात मोहोळच्या राजकारणाची चर्चा आहे. यासंबंधी अजित पवार यांच्याशी संवाद झाला असून, धक्कातंत्र वापरून आम्ही देखील भाजपचे नेते फोडू. मात्र ते सांगून करणार नाही. असे सुतोवाच देखील उमेश पाटील यांनी यावेळी दिले.


















