सोलापूर – शासन आणि प्रशासन दोन्ही मिळून जर हातात हात घालून काम केले तर निश्चितच कामकाज गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला. ते होटगी येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
।याप्रसंगी तहसीलदार किरण जमदाडे, जिल्हा परिषद सदस्य रामप्पा चिवडशेट्टी, पंचायत समितीचे सभापती संदीप टेळे सरपंच लक्ष्मीबाई गायकवाड, पंचायत समिती सदस्या अंबिका पाटील, पंचप्पा धनशेट्टी, बलवान गोतसुर्वे, बाजार समितीचे संचालक अतुल गायकवाड, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, नायब तहसीलदार राजाभाऊ भंडारे, नायब तहसीलदार विनायक कुलकर्णी, नायब तहसीलदार रुपाली करमाळकर आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरासाठी प्रशासकीय अधिकारी शासनाच्या आदेशानुसार आपले कार्यालय सोडून ते आपल्या चेहऱ्यावरील काम पूर्ण झाल्याचा आनंद पाहण्यासाठी सर्व यंत्रणेसह आपल्या गावात आले आहेत. तेव्हा या शिबिरातून एकही नागरिक नाराज होऊन रिकाम्या हाती जाणार नसल्याची ग्वाही तहसीलदार किरण जमदाडे यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्याचे पूजन आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. शिबिराच्या ठिकाणी सेतू कार्यालयातील सेवा ,आधार कार्ड , शिधापत्रिका, जातीचे दाखले, शैक्षणिक दाखले, राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, सातबारा दुरुस्ती आदी विविध सेवा एका छताखाली देण्यात आल्या. कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास वाळू चे परवाने, अंगणवाडीच्या लाभार्थ्यांना बेबी किट्स, कृषी विभागाकडून ट्रॅक्टर प्रमाणपत्र आदि विविध दाखल्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. शाळा परिसरात आमदार सुभाष देशमुख व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
शिबिरासाठी महसूल विभाग ग्रामपंचायत यांनी यंत्रणा सज्ज ठेवली होती, नागरिकांसाठी सावली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था करण्यात आली होती. सुविधा कक्षाद्वारे तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी व तलाठी यांनी प्रत्येक नागरिकांना अर्ज भरून देणे, विविध दाखले देणे, मार्गदर्शन केल्याने नागरिकांना शिबिराचा लाभ घेणे अधिक सोयीचे झाले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडल अधिकारी प्रतिभा घुगे, रियाज भाईजान, संतोष फुलारी, ग्राम महसूल अधिकारी शेखर शेड्याळ, सचिन सावळे,अजय राठोड, वामन जाधव, ग्रामसेवक सुरेश कोळी, पोलीस पाटील रेणुका इंगळे, कोतवाल मल्लू कोळी, सोनाली चिवडशेट्टी, अंगणवाडी सेविका अन्नपूर्णा फुलारी आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंद्रजीत लांडगे तर असीम शेख यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास होटगी मंडलातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…
चौकट
…
अडीच हजाराहून अधिक नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ.
————
1.पुरवठा व सेतु विभाग- 698
2.घरकुल वाळू वाटप- 87
3.विविध दाखले, प्रमाणपत्रे व आधारकार्ड- 393
4.निराधार योजना व निवडणूक – 162
5.7/12 व खाते उतारा वितरण- 409
6.आरोग्य विभाग, पोलीस विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास विभाग, पशुवैद्यकीय विभाग, महापारेषण विभाग – 319
7. AgriStack नोंदणी मंजूरी- 661

























