लातूर : लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा विभागाने अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह एकूण ४ लाख २३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लातूर जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या धोरणानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून शोधमोहीम राबवत येत आहे.
त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात सोमवारी पहाटे स्थानिक गुन्हे शाखे च्या पथकाने एक मोठी कारवाई करून अवैध देशी दारूची वाहतूक करणारा एक आरोपी ताब्यात घेतला, तर एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनिय खात्रीशीर माहितीनुसार तोंडारपाटी साखर कारखाना—हंगरगा रोडमार्गे एक चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली.
ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून पहाटे ४ . ३५ वाजता तोंडारपाटी साखर कारखाना परिसरात सापळा लावण्यात आला. पथकाने एक टाटा इंडिका व्हिस्टा क्रं . एमएच १४ – एफएम- ५८८१ मधून देशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांची कसून चौकशी केली. तेव्हा अंधाराचा फायदा घेऊन एक जण पळून गेला. वाहन चालक संदीप वैजनाथ शिंगे , रा. लोहारा, ता. उदगीर, जि. लातूर यास ताब्यात घेतले . तर दिपक उर्फ जंबू पंडीत बनसोडे, रा. लोहारा, ता. उदगीर हा फरार झाला. या वाहनात अवैध देशी दारूचा साठा आढळून आला. त्यामध्ये देशी दारूच्या ३२ बॉक्स आढळून आले. या वाहतुकीसाठी वापरलेले वाहन आणि दारूची एकूण किंमत ४ लाख २३ हजार २०० रुपये एवढी आहे.
लातूर जिल्ह्यात अवैध दारू व्यवसाय, जुगार, मटका, चोरटी वाहतूक, गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा सतत पाळत ठेवून आहे. अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पुढील काळातही अधिक तीव्र मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशावरून अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अमलदार तुळशीराम बरुरे, संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, पाराजी पुठेवाड यांनी केली आहे.
























