पंढरपूर – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत अजित पवार यांच्या अस्थीकलशाचे पूजन करुन येथील चंद्रभागेच्या पात्रात अस्ती विसर्जन करण्यात आले. यावेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नुकतेच बारामती येथे विमान दुर्घटने मध्ये निधन झाले. त्यामुळे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मिक निधनाने संपुर्ण राज्य शोकसागरात बुडालेला होता. राज्य शासनाने देखील राज्यात तिन दिवसांचा दुखवटा पाळला. दरम्यान दिवंगत अजित पवार यांच्या अस्थि तसेच रक्षा खास बारामतीहून पवित्र चंद्रभागेच्या पात्रात विसर्जित करण्यासाठी मंगळवारी (ता.३) येथे आणण्यात आल्या.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मांडव उभा करुन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे छायाचित्र देखील त्या मध्ये ठेवण्यात आलेले होते. बारामतीहून अस्थि येणार असल्यामुळे सकाळ पासूनच कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमण्यास सुरुवात झालेली होती. चौका मध्ये अजित दादांच्या स्मृतिप्रित्यर्थ दादांची वेगवेगळी भाषणे स्पीकर वरुन लावण्यात आलेली होती. बारामतीहून अस्थिकलश येथे दाखल झाल्या नंतर तो चौफाळ्या मध्ये ठेवण्यात आला. त्याठिकाणी नागरिकांनी अस्थिकलशाच्या दर्शनासाठी गर्दी केलेली होती. त्या नंतर हा अस्थिकलश चंद्रभागेच्या वाळवंटात आणण्यात आला. त्या ठिकाणी अस्थिकलशाचे पूजन करुन तो अस्थिकलश सजविलेल्या होडीमधून चंद्रभागेच्या पात्रात मध्यभागी नेऊन त्या ठिकाणी दादांच्या अस्थिंचे विसर्जन करण्यात आले. यावेळी अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते भावुक झालेले दिसत होते. अस्थिकलशाचे विसर्जन करताना अजित दादा अमर रहेच्या घोषणांनी वातावरण स्तब्ध झालेले होते. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांना अश्रु अनावर झाल्याचे दिसत होते.
यावेळी आमदार अभिजीत पाटील, शिवसेनेचे संजय बाबा कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, श्रीकांत शिंदे, संदीप मांडवे, सुरज पेंडल, संदीप पाटील, तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण, सुमित शिंदे, प्रशांत शिंदे, वर्षा शिंदे, चारूशिला कुलकर्णी आदींसह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते उपस्थित होते.
















