आटपाडी – सौर उर्जा, पवन उर्जा निर्मितीस अत्यंत अनुकुल असणाऱ्या आटपाडी तालुक्यातून प्रतिवर्षी १ हजार कोटी रुपयांची वीजनिर्मिती होवू शकेल. यासाठी तालुक्यात या सौर, पवन उर्जा निर्मिती प्रकल्पांची तातडीने उभारणी केली जावी . अशी मागणी राज्य शासन, विविध लोकप्रतिनिधींना पाठविलेल्या निवेदनाद्वारे आटपाडीचे सामाजीक कार्यकर्ते सादिक खाटीक यांनी केली आहे .
पहिल्या टप्प्यात राज्यातील किमान शंभर तालुक्यात हे प्रकल्प उभारले जावेत . त्यातुन १ लाख कोटी रुपयांच्या वीज निर्मितीचा राज्याला मोठा फायदा होवू शकतो . हा प्रयोग राज्यभर राबविला जावा . असे सादिक खाटीक यांनी म्हंटले आहे .
राजस्थानच्या जैसलमेर शहराच्या समांतर आटपाडी तालुक्याच्या उष्णतेची त्रिव्रता लक्षात घेता सौर उर्जा प्रकल्प आणि तालुक्याच्या डोंगर रांगावर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासाठी पवनऊर्जा प्रकल्पाची निर्मिती झाली पाहीजे .
शासकीय, गायरानाच्या जमिनी, देवस्थान इनाम वर्गच्या जमिनी, वनविभाग आणि कुरणांच्या क्षेत्राखालील जमिनी, प्रचंड डोंगररांगा, गावोगावचे ओढे, ओघळी, ताली, यांच्यातून उपलब्ध होणाऱ्या असंख्य किलोमीटरच्या आणि मोठ्या रुंदीच्या जमिनी, गाव तलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारे, मोठे तलावांच्या पाणलोट क्षेत्रातील आणि कालव्यांच्यावरील अस्तरीकरणातून आणि इतर सर्व बाबीतून उपलब्ध होणाऱ्या अंदाजे दीड लाख एकर पैकी अंदाजे ५० हजार एकर जमिनीवर सौर उर्जा, पवन उर्जा निर्मितीचे प्रकल्प साकारल्यास प्रतिवर्षी किमान १ हजार कोटी रुपयाची वीज निर्मिती होवू शकेल . याशिवाय हजारो पवनचक्क्यातून निर्माण होणाऱ्या शेकडो कोटी रुपयांच्या वीज निर्मितीच्या माध्यमातून दुष्काळी, उपेक्षित, वंचित, मागास आटपाडी तालुक्याचा सर्वांगीण व चौफेर विकास करणे शक्य होईल .
साधारणतः ३५ एकरावर अति अत्याधुनिक विकसीत तंत्रज्ञानाच्या सौर उर्जा प्रकल्पातून १० ते १२ लाख युनिट अर्थात १ मेगावॅट वीजनिर्मिती होवू शकते. या वीज निर्मितीतून ८० लाख रुपयाचे उत्पन्न मिळू शकते . असे सौर उर्जेच्या गृहीतकाचे शास्त्र सांगते . त्यानूसार आटपाडी तालुक्यातील ५५ हजार हेक्टर अर्थात १ लाख ३७ हजार ५०० एकर पिकाखालील जमीन सोडली तर पिकावू नसलेल्या उर्वरीत उंदाजे दीड लाख एकर पैकी सुरवातीला ५० हजार एकर एरीयात सौर आणि पवन उर्जेचे प्रकल्प उभारले गेले पाहिजेत.
प्रत्येक तालुक्यातला सौर उर्जा आणि पवन उर्जा प्रकल्प, तालुक्याचे मुख्यालय ठिकाणची ग्रामपंचायत अथवा नगरपंचायत अथवा नगरपालिका, त्या तालुक्याची पंचायत समिती आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या नियंत्रणाखाली चालवला पाहीजे . या प्रकल्पातुन येणाऱ्या १ हजार कोटी उत्पनापैकी उत्पन्नाचा ३०० कोटीचे उत्पन्न तालुका स्तरावरील ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत अथवा नगरपालीकांना दिले पाहीजे . कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तालुका पंचायत समित्यांना प्रत्येक ३५० कोटी रुपयेचे उत्पन्न देवून या संस्था बलवान केल्या पाहीजेत .
सौर उर्जा आणि पवन उर्जेतून मिळणाऱ्या उत्पन्नातून तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, मार्केट कमेट्यांना सर्वांगीण व चौफेर विकास साधताना प्रचंड गती मिळणार आहे . यासाठी हे प्रकल्प प्रत्येक तालुक्यात उभारून देशात सर्वात प्रगतीशील राज्य म्हणून ग्रामीण महाराष्ट्राला बनविले पाहीजे . असेही सादिक खाटीक यांनी शेवटी स्पष्ट केले .