राष्ट्रवादीचे नेते सारंग पाटील यांनी कोरेगावमधील विजय निश्चय मेळाव्यात जोरदार भाषण केलं. सातारा जिल्ह्यानं प्रतिसरकार स्थापन करुन इंग्रजांविरोधात संघर्ष केला होता, असंही ते म्हणाले.
सातारा जिल्ह्यातील मागच्या पिढीनं जे जे केलेलं आहे तो आम्हा पुढील पिढीच्या लोकासांठी कर्तव्य धर्म आहे. पुरोगामी विचार जपण्याचं काम आमची पिढी करेल, असं राष्ट्रवादीचे नेते सारंग पाटील यांनी म्हटलं. जयंत पाटील यांनी विजय निश्चय मेळाव्याची सुरुवात साताऱ्यातून केलेली आहे. २०२४ च्या लोकसभेला सामोरं जात असताना विश्लेषक म्हणत असतील काळजीची परिस्थिती आहे. २०१९ ला पाहिलं तर हिच परिस्थिती होती. असेच एक एक करुन ३० ते ४० जण गेले. आता घाऊक पद्धतीनं लोकं गेलेली आहेत, असं सारंग पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याच्या मनात शरद पवार यांच्या बद्दल विश्वास आहे. २०१९ ला अनेक पितापुत्रांच्या जोड्या निघून गेल्या होत्या. उस्मानाबादचे गेले कुठं आहेत आता, अकलूजचे गेले कुठं आहेत आता, अकोलेचे गेले कुठं आहेत आता, इंदापूरचे गेले ते कुठं आहेत. हे सगळे गेले ते हरवले, स्वत:चं अस्तित्व हरवून बसले, असं सारंग पाटील म्हणाले. २०१९ मध्ये निवडणुकीच्या काळात विजयसिंह मोहिते पाटील, रणजीत मोहिते पाटील, पद्मसिंह पाटील,राणा जगजितसिंह पाटील, मधुकर पिचड, वैभव पिचड यांनी पक्ष सोडला होता.
सातारा जिल्ह्याला पुरोगामी विचार आणि नेता एकच शरद पवार हे माहिती आहे. एक विचार, एका नेत्याशी कटिबद्ध असलेला सातारा जिल्हा आहे. शरद पवार सांगतील ते धोरण, बांधतील ते तोरण या विचारावर चालणारा हा जिल्हा आहे. २०१९ ची किमया पुन्हा घडणार आहे. या निवडणुकीला सामोरं जात असताना सर्वांची एकी आहे. शरद पवार, जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे ठरवतील ती सातारा जिल्ह्याची दिशा असेल, असं सारंग पाटील यांनी म्हटलं.
२०१९ च्या पुढं जाऊन सातारा जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्ता काय करेल हे येत्या पुढच्या काही महिन्यात पाहायला मिळणार आहे. सामान्य माणसाला हे पटलेलं नाही, जे झालंय ते रुचलेलं नाही. सातारा लोकसभेचा विजय संकल्प मेळावा होत आहे. श्रीनिवास पाटील यांना राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकारणात पडायचं नसतं हा संकेत आहे. मात्र, आणीबाणीची स्थिती निर्माण झाली. आपण सर्वांनी आग्रह केला, निश्चय केला. प्रयत्नांची पराकष्टा केली म्हणून चमत्कार घडवून दाखवला, असं सारंग पाटील यांनी सांगितलं.
हा यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा आहे. हा जिल्हा महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम करतो. सातारावरुन जी प्रेरणा घेऊन जाल, त्याच्या मशाली लोकसभा मतदारसंघात जिथं जिथं जाल त्या प्रज्वलित होतील. राष्ट्रवादीच्या पाठिशी या महाराष्ट्रातील सामान्य कार्यकर्ता पेटून उभा राहिलं, असं सारंग पाटील म्हणाले.