अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आता उमेदवारांच्या माघारीवरून आरोपप्रात्यारोप सुरू झाले आहेत. एमआयएमचे डॉ. परवेज अशरफी यांच्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे दिलीप कोंडीबा खेडकर, अपक्ष उमेदवार नीलेश साहेबराव लंके यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. याशिवाय काही अपक्षांसोबतच शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार गिरीष जाधव यांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे. हे उमेदवार रिंगणात उतरले तेव्हा आरोपप्रात्यारोप झाले. आता त्यांच्या माघारीवरूनही पुन्हा आरोपप्रात्यारोप सुरू झाले आहे. मात्र, आता महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यात थेट लढत होणार आहे.
या उमेदवारांनी अर्ज दाखल केले तेव्हा आरोप झाले होते. अपक्ष लंके आणि एमआयएम तसेच वंचित आघाडीचे उमेदवार विखे पाटील यांच्या प्रोत्साहनातून उभे राहिल्याचा आरोप लंके यांच्याकडून करण्यात येत होता. सभांमधूनही हेच आरोप होत होते. तर विखे यांच्या विरोधात तक्रारी करणाऱ्या जाधव यांच्या उमेदवारीमागे महाविकास आघाडीचीच फूस असल्याचा आरोप होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लंके यांच्या बाजूने अपक्ष उमेदवार लंके यांच्या अर्जाचाच मुद्दा तापविला जात होता.
आता या उमेदवारांनी माघार घेतली. माघारीच्या पोस्ट लंके समर्थकांकडून व्हायरल करून विखे समर्थकांना डिवचण्यात आले. विखेंचा डाव हाणून पाडल्याचे लंके समर्थक सांगू लागले. त्यातील काही उमेदवारांनी लंके यांना पाठिंबा दिल्याचेही व्हिडिओही व्हायरल करण्यात आले. त्यानंतर मात्र विखे समर्थकांनीही लंके समर्थकांवर आरोप करायला सुरवात केली आहे. या उमेदवारांनी लंके यांच्या दबावाखाली अगर इतर काही कारणांमुळे माघार घेतली असावी, लंके यांनीच सहानुभूती मिळविण्यासाठी हे उमेदवार उभे केले आणि नंतर माघार घेऊनही जिंकल्याचे सांगत आहेत, असे आरोप करण्यास सुरवात झाली आहे.
या उमेदवारांच्या माघारीमुळे आता दोघांत सरळ लढत होणार असली तरी प्रचारात हा मुद्दा आणखी काही काळ आरोपप्रात्यारोपाच्या रुपाने येत राहण्याची शक्यता आहे. एकूणच या निवडणुकीत प्रचारात राष्ट्रीय मुद्यांपेक्षा स्थानिक मुद्दे आणि कुरघोड्यांवरच जास्त भर दिल्याचे आढळून येत आहे. राष्ट्रीय नेत्यांच्या सभांनंतरही यात बदल होताना दिसत नाही. त्यामुळे यापुढेही प्रचार असाच सुरू राहिला तर मूळ मुद्दे राहून जाण्याची शक्यता आहे.