अरुणाचल प्रदेशात भाजपा विक्रमी जागांवर आघाडी घेत सत्तास्थापनेच्या तयारीत दिसत आहे. तर सिक्कीम मध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पुन्हा सत्तेत येणार असल्याचं निकालावरुन समजत आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अरुणाचल प्रदेशमधील विधानसभेच्या एकूण ६० जागांवर निवडणूक जाहीर झाली होती. ज्यामधील १० जागांवर भाजपाने आधीच बिनविरोध विजय मिळवला होता. तर निकालातील पुढच्या आकड्यांनुसार भाजपाने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. तर काँग्रेस पूरती धोबीपछाड झाल्याचे निकालातून समजते.
अरुणाचल प्रदेशात भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षाबरोबरच नॅशनल पीपल्स पार्टी (एनईपी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा देखील काहीसा वावर या प्रदेशात आहे. एनईपी सध्या ८ जागांवर आघाडीवर असून राष्ट्रवादी काँग्रेसने ३ जागांवर आपले खाते खोलले आहे. दुसऱ्या बाजूला सिक्कीम विधानसभा निवडणुकीसाठी ३२ जागांसाठी एकूण १४६ रिंगणात होते. यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग, त्यांच्या पत्नी कृष्णा कुमारी राय, माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग आणि माजी भारतीय फुटबॉलपटू बायचुंग भुतिया या प्रमुख उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे.
अरुणाचलमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस तर सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा (एसकेएम)आणि सिक्कीम डेमॉक्रॅटिक फ्रंट (एसडीएफ) यांच्यात मुख्य लढत आहे. सिक्कीम मधील ३० जागांचे निकाल समोर आले आहेत. ज्यामध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा आघाडी घेत असल्याचे चित्र आहे. तर विरोधी पक्ष एसडीएफ फक्त १ जागा घेऊन पिछाडीवर असल्याचे दिसते.