देगलूर / नांदेड : येथील नगरपरिषद निवडणुकीची वातावरणनिर्मिती जोर धरत असून सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन प्रमुख पक्षांनी प्रचार यंत्रणेत स्पष्ट आघाडी घेतली आहे. तर भारतीय जनता पक्षाकडूनही ‘डोअर टू डोअर’ प्रचार मोहीम राबवली जात आहे. पण अद्याप भाजपाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात आली नसल्याने प्रचार यंत्रणा संथ गतीने चालू आहे.
नगरपरिषद निवडणूकीची प्रचार यंत्रणा सकाळपासून रात्रीपर्यंत घराघरांमध्ये संपर्क, गाठीभेटी, प्रभागनिहाय समीकरणे आणि संघटनात्मक तयारीचा वेग वाढला आहे. सध्या देगलूरात माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे प्रचार विविध प्रभागात चालू आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे लक्ष्मीकांत पदमवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत. भाजपाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची अद्याप अधिकृत घोषणा न झाल्याने स्पष्ट भूमिका दिसून येत नाही. पण नुकतेच भाजपात गंगाधर भांगे आणि प्रशांत दासरवाड यांच्यापैकी एकाला (यांच्या घरच्या महिला व्यक्तीला) नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे.
यंदा पक्षप्रवेश, प्रचाराची गती, नियोजन आणि कार्यकर्त्यांची हालचाल पाहता काँग्रेसने चांगलेच मैदान तयार केले आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनही व्यूव्हरचना आखली जात असल्याची भावना व्यक्त होत आहेत. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपापल्या प्रभागात भेटिगाठी घेत हालचाल गतीमान करीत असल्याचे दिसून येत आहे. मोठा जनसमुदाय न जमवता अंतर्गत प्रचार यंत्रणा भाजपाची चालू आहे. यासाठी आमदार जितेश अंतापुरकर आणि माजी नगराध्यक्ष शंकरराव कंतेवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
इतर पक्षांकडूनही काही प्रमाणात हालचाली सुरू आहेत. काही पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपात सामील होण्याची चिन्हे दिसत आहेत. सद्यःस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रचार अधिक परिणामकारक ठरत असून खरी लढत या दोनच पक्षांमध्ये होण्याची शक्यता आहे.

















