शहर मध्य विधानसभा मतदारसंघात पद्मशाली आणि मुस्लिम बांधवांचे मतदान मोठ्या प्रमाणात होण्याची ही पहिलीच निवडणूक होती. दहा वर्षात लोकसभेला भाजप तर विधानसभेला काँग्रेस असे चित्र होते. यंदा मात्र दोन्ही पक्षांच्या पारंपरिक मतदारांनी भरभरून मतदान केल्याने लीड मिळण्याचा दावाही दोन्ही पक्ष करत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आमदार टी. राजा यांच्या सभेनंतर पद्मशाली बांधवांमध्ये एक चैतन्याची ऊर्जा पाहायला मिळाली. ती ऊर्जा मतदानापर्यंत कायम होती. तितक्याच ताकदीने एमआयएएम, लालबावटा काँग्रेसच्या पाठिशी भक्कमपणे उभी असल्याचे दिसून आले.
शहर मध्य विधानसभा मतदारसंघात पद्मशाली, मुस्लिम या समाजाचा वर्चस्व अधिक आहे. ’जो राम को लाये हम उनको लायेगें’चा नारा केवळ याच भागात ऐकायला मिळाला. पद्मशाली समाजाची ताकद अधिक असली तरी पद्मशाली समाज नेत्यांमध्ये विभागाला गेला आहे.
मागील दोन लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला या मतदारसंघातून ७० ते ७५ हजार मतदान तर काँग्रेसला ५० ते ५० हजार मतदान झाले. यंदाची परिस्थिती वेगळी आहे. भाजप विरुद्ध एआयएएम, लालबावटा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित अशी लढत झाली आहे.