सोलापूर जिल्ह्यात यंदा कमी पडलेला पाऊस तसेच हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा बागेमध्ये तीन टप्प्यांमध्ये मोहर आला होता. त्यामुळे यंदा केशर आंबा तीन टप्प्यांमध्ये म्हणजे एप्रिल, मे व जून महिन्याच्या अखेरीपर्यंत बाजारात उपलब्ध होईल, अशी माहिती कोर्टी (ता. पंढरपूर) येथील आंबा बागायतदार सचिन कुलकर्णी यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्वी डाळिंब फळबागेची मोठ्या प्रमाणावर लागवड होत होती. मात्र, मागील काही वर्षांमध्ये तेल्या व मर रोगामुळेमुळे डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांचा कल केशर आंबा, पेरू, केळी, सिताफळ आदी फळबागांची लागवड करण्याकडे वाढला आहे. पंढरपूर तालुक्यात केशर आंबा फळबागेचे एकूण क्षेत्र सुमारे ४९० हेक्टर आहे. यावर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. त्यामुळे आंब्याच्या झाडांना जास्त ताण मिळाल्याने व थंडीच्या हंगामामध्ये सकाळी सरासरी १५ अंश तापमान राहिल्याने यंदा बहुतांश आंब्याच्या झाडांना लवकर मोहर आला.