बार्शी – बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी येथे संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. एस. व्ही. शिंदे यांची उपस्थिती लाभली, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. ए. ढगे यांनी करत संविधान दिनाच्या पार्श्वभूमीचा थोडक्यात आढावा घेतला.
मुख्य व्याख्यानात प्रा. एस. व्ही. शिंदे यांनी भारतीय संविधान कसे तयार झाले, संविधान सभेची कार्यपद्धती, प्रमुख टप्पे, तसेच सामाजिक न्याय, समता व लोकशाहीची मूल्ये याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधान साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करत स्वतःमधील नागरिकभाव जागवण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. एस. बी. करंडे यांनी इतिहासातील उदाहरणे देत संविधानाचे संरक्षण करणे ही प्रत्येक युवकाची कर्तव्यभावना असल्याचे सांगितले. “स्वातंत्र्य मिळवणे जितके कठीण, त्याचे रक्षण करणे त्याहून कठीण. युवकांनी संविधान समजून घेतले तरच देशाची वाटचाल योग्य दिशेने होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही. पी. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रोहित डिसले यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे IQAC समन्वयक डॉ. बी. डी. लांडे, NSS कार्यक्रम अधिकारी प्रा. के. एम. माळी, प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब पाटील, संगणक विभाग प्रमुख बाळासाहेब लिंगे, मोरे, ज्युनियर विभाग समन्वयक पोहळकर, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



















