बार्शी – महाराष्ट्राला पुरोगामी परंपरेचा वारसा लाभला आहे. फुले-शाहू-आंबेडकर या विचारधारेतून महाराष्ट्राची जडणघडण होत आलेली आहे. आद्य समाजसुधारक महात्मा फुले यांनी त्यांच्या साहित्यिक लेखनातून सामाजिक क्रांतीची प्रेरणा दिली, असे मत प्रा.डॉ. राहुल पालके यांनी व्यक्त केले. येथील श्री शिवाजी महाविद्यालयात महात्मा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ते बोलत होते. महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीचे पर्व सुरु झाले असून हा जयंती कार्यक्रम उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. बी. शेख व समितीचे चेअरमन डॉ. एस. बी. शिंदे हे उपस्थित होते.
प्रमुख व्याख्याते डॉ. राहुल पालके यांनी आपल्या व्याख्यानातून महात्मा फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक कार्याचा सखोल आढावा घेतला. ते म्हणाले, फुले यांनी स्त्रीशिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन आणि समाजातील अन्यायाविरुद्ध लढा देऊन भारतीय समाजात परिवर्तन घडवून आणले. त्यांच्या विचारांमुळे समानता, बंधुता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले.
फुले यांच्या विचारांची प्रासंगिकता स्पष्ट करत त्यांनी शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे हे स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. ए. बी. शेख यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा सर्वसमावेशक आढावा घेतला. त्यांनी फुले यांच्या शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी फुले यांच्या विचारांची उपयुक्तता प्रस्तुत करीत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा अंगीकार करीत सामाजिक बांधिलकी जपावी, असे स्पष्ट केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये महात्मा फुले यांच्या विचारांबद्दल जागरूकता निर्माण झाली. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























