वैराग – बार्शी तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या वैराग शहरात सध्या अतिक्रमणाने रौद्र रूप धारण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हिंगणी रोड या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणामुळे दररोज भीषण वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीचा सर्वाधिक फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसत असून, वारंवार तक्रारी करूनही नगरपंचायत आणि जिल्हाधिकारी प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संतापजनक आरोप नागरिक करत आहेत.
वैराग हे परिसरातील शिक्षणाचे केंद्र आहे. सकाळी आणि संध्याकाळी शाळा-महाविद्यालयांच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पाय ठेवायलाही जागा उरत नाही. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या टपऱ्या, हातगाड्या आणि व्यापाऱ्यांनी रस्त्यावर काढलेले ओटे यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. यामुळे विद्यार्थिनींना गर्दीतून वाट काढताना कसरत करावी लागत असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या वाहतूक कोंडीमुळे आतापर्यंत अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे, काही अपघातांमध्ये नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. एखाद्याचा मृत्यू होऊनही प्रशासनाला जाग येत नसल्याने वैरागच्या जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तक्रारींची केराची टोपली
गावातील जागरूक नागरिकांनी या अतिक्रमणाबाबत वैराग नगरपंचायत आणि जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्याकडे पुराव्यासह अनेकदा लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र, ‘आज करू, उद्या करू’ या आश्वासनापलीकडे कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे अतिक्रमणधारकांचे मनोबल अधिकच वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
नागरिकांची मागणी:
* छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हिंगणी रोडवरील सर्व कच्ची व पक्की अतिक्रमणे तातडीने हटवावीत.
* वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुख्य चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करावा.
* शाळेच्या वेळेत अवजड वाहनांना प्रवेशबंदी करावी. “प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास, भविष्यात होणाऱ्या अपघाताला नगरपंचायत प्रशासन जबाबदार असेल. आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही,” अशी भावना संतप्त ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

























