सोलापूर – जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक रणधुमाळी सुरु झाली असतानाच मोहोळ तालुक्याच्या राजकारणात भूकंप झाला असून ज्येष्ठ नेते मनोहरभाऊ डोंगरे व त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज डोंगरे यांनी भाजपातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
दरम्यान डोंगरे पिता-पुत्राच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे मोहोळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची समिकरणे आता बदलणार असून जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे विधानसभा निवडणुकीतील सर्वपक्षीय आघाडीचा पॅटर्न राबवून आघाडीची वज्रमूठ एकवठून पुन्हा अनगरकरांना नेस्तनाभूत करणार असल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या उमेश पाटील यांची पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दुखावलेल्या माजी आमदार राजन पाटील व त्यांच्या चिरंजीवांनी भाजपाचा रस्ता धरला. तर नगरपरिषदेच्या निवडणुकीत विक्रांत पाटील यांनी ना.अजित पवार यांनाच आव्हान दिले. यापार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी पुन्हा एकदा मोहोळ तालुक्यात आघाडीचा नारा दिला आहे.
जिल्ह्याचे दुसरे ज्येष्ठ नेते बळीरामकाका साठे यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन्मानाने घेऊन जिल्हाध्यक्ष पाटील यांनी संघटन कौशल्य् सिद्ध केले आहे. तसेच करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांना सोबत घेऊन तसेच अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे चिरंजीव शिवानंद पाटील, संजीव पाटील यांनाही पक्षात घेऊन ना.अजितदादांच्या पक्षाची पकड जिल्ह्यात मजबूत करण्यावर भर दिला आहे.
गुरुवारी बारामती येथे लोकशक्ती परिवाराचे मनोहरभाऊ डोंगरे व विजयराज डोंगरे यांना ना.अजितदादांच्या हस्ते पक्षात आणून मोहोळ तालुक्यातील बदलत्या राजकीय समिकरणाचे रणशिंग फुंकले आहे. डोंगरे यांना तालुक्यात मानणारा मोठा वर्ग आहे. एककाळ मनोहर डोंगरे व राजन पाटील या जोडीने तालुक्यातील नेतृत्वाची घडी एकसंध ठेवली होती. मात्र, अलिकडे दोन्ही नेते विभक्त झाले. विजयराज डोंगरे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. मात्र, आता राजन पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यामुळे डोंगरे यांनी ना.अजितदादांचे नेतृत्व् मान्य केले आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे मोहोळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची समिकरणे बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. डोंगरे पिता-पुत्रासह सुनील पाटील, बाबूराव कोकाटे, पैलवान नितीन निळे, दीपक पुजारी, सर्जेराव चवरे, सहदेव पुजारी, दीपक गवळी, सादिक तांबोळी, महावीर पुजारी, सागर थोरात, मुन्ना बचुटे या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
चौकट
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ज्यांना मोठे केले त्यांनीच ना.अजितदादांशी गद्दारी केली. मोहोळ तालुक्याची माती गद्दारांना कधीच माफ करीत नाही. हे विधानसभा निवडणुकीत इथल्या स्वाभिमानी मतदारांनी दाखवून दिले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांची भाजपामध्ये जाण्याची कुणकुण तालुक्यातील जनतेला लागली. त्यामुळे त्या निवडणुकीत त्यांना जनतेने स्विकारले नाही. आता तर उघडपणे त्यांनी पाठ फिरविली. त्यामुळे विधानसभा निवडणूक झाँकी है. जिल्हा परिषद निवडणूक अभी बाकी है – उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष
फोटो ओळी – मोहोळ तालुक्यातील ज्येष्ठ नेते मनोहरभाऊ डोंगरे व विजयराज डोंगरे यांनी गुरुवारी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी छायाचित्रात ना.पवार, डोंगरे पिता-पुत्र, जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आदी.






















