तभा वृत्तसेवा,
पंढरपूर – शीतगृह शवपेटी लोकार्पण सोहळा येथील सिंहगड इंजिनिअरिंग काँलेजचे प्राचार्य डॉ.कैलश करांडे यांच्या हस्ते शहरातील निकते सर्जिकल येथे मंगळवारी ( दि.१०) संपन्न झाला.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. कैलश करांडे यांनी समाजातील दुःखाच्या प्रसंगी कुटुंबियांना सन्मानपूर्वक आधार देण्याच्या उदात्त हेतूने साकारलेला एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मानवतावादी सेवाभावी असा हा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
येथील ओम साई राम स्टील अँड प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत, रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्या माध्यमातून हा उपक्रम अंमलात आणता आल्याबद्दल त्यांनी ओमसाईराम स्टील अँड प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांचे तसेच रोटरी क्बलच्या सदस्यांचे देखील आभार व्यक्त केले.
या लोकार्पण सोहळ्यास रोटरी क्लब ऑफ पंढरपूरचे अध्यक्ष डॉ. वैभव सादिगले, सचिव मयूर परिचारक, प्रकल्प प्रमुख सोमेश गानमोटे तसेच रो किशोर निकते,सचिन भिंगे,शेखर शिंदे आदींसह रोटरी सदस्य उपस्थित होते.
———————
अत्यंत आवश्यक सेवा
शीतगृह शवपेटी ही वैद्यकीय व सामाजिक दृष्ट्या अत्यंत उपयुक्त सुविधा असून, आकस्मिक निधन झाल्यानंतर दूरवरून येणाऱ्या नातेवाईकांची प्रतीक्षा किंवा अंतिम विधीची तयारी होईपर्यंत पार्थिव देह सुरक्षित व सन्मानपूर्वक जतन करण्यासाठी ही सुविधा अत्यंत आवश्यक ठरते. अशा संवेदनशील क्षणी कुटुंबीयांना आधार देणारा हा उपक्रम समाजासाठी मोलाचा ठरणार आहे असेही डॉ. कैलश करांडे यांनी केले.
——————-
माफक दरात सेवा
ही सेवा अत्यंत माफक दरात रोटरी क्बलचे किशोर निकते यांच्या निकते सर्जिकल जुनी पेठ या दुकानातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेसाठी संपर्क: श्री वैभव ८८०६०८०६१७ असे देखील आवाहन करण्यात आलेले आहे.


























