सोलापूर – श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट संचलित श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक च्या वार्षिकांक “ सिद्ध २०२५” या प्रकाशन व “सिद्धोत्सव २०२६” चा उदघाटन सोहळा शनिवार, २७ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे उपाध्यक्ष श्री. सिद्धेश्वर बमणी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू मा. डॉ. श्री. इरेश स्वामी उपस्थित होते व देवस्थानाचे सचिव श्री. निळकंठप्पा कोणापुरे, देवस्थानाचे विश्वस्त श्री पशुपती माशाळ, श्री प्रभुराज मैंदर्गीकर तसेच सिद्धेश्वर बालक मंदिरचे मुख्याध्यापक नागेश रायकोटी, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलाने झाली.
प्रमुख पाहुणे डॉ.श्री. इरेश स्वामी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचा वार्षिक अंक हा विद्यार्थिनींमध्ये दडलेल्या भावना, विचार व अभिव्यक्ती शब्दरूपात मांडण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले. मुली आपल्या वडिलांबद्दल किती संवेदनशील असतात याची सखोल अनुभूती या अंकातील लेखनातून मिळाल्याचे त्यांनी विशेषत्वाने सांगितले. विविध कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थिनींना आपले विचार मांडण्याची संधी या अंकाच्या माध्यमातून मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले. आजच्या काळात हळूहळू लुप्त होत चाललेल्या लेखनशैलीला नवसंजीवनी देण्यासाठी अशा वार्षिक अंकांची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी आवर्जून अधोरेखित केले. व्यक्तीमधील व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी व ते निखरण्यासाठी ‘सिद्ध’ अंकाचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. हा अंक विद्यार्थिनींची सर्जनशीलता, प्रतिभा आणि लेखनकौशल्य उजळून येण्यासाठी अत्यंत मोलाचे योगदान देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. अंकाच्या ‘सिद्ध’ म्हणजेच परिपूर्ण या नावाप्रमाणे हा अंक अधिकाधिक यशस्वी ठरावा, यासाठी त्यांनी विद्यार्थिनींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच लेखन करणाऱ्या सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
वार्षिकांक सिद्ध २०२५ चे संपादक प्राध्यापक डॉ. श्रीशैल मळेवाडी यांनी यांनी प्रास्ताविक करून अंकाची ओळख करून दिली. या अंकामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश व कन्नड असे भाषेचे चार विभाग तसेच कला, क्रीडा, टेक्निकल असे तीन विभाग आहेत. मॅगझिन सेक्रेटरी मृणाल एकबोटे यांनी सांगितले की हा अंक नेतृत्व विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि हा फक्त अंक नसून विद्यार्थिनींनी केलेल्या कार्याचे एक आठवण पुस्तिका आहे.
महाविद्यलयाचे प्राचार्य गजानन धरणे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले की, हा वार्षिक अंकाचा चौदावा अंक आहे. सिद्धोत्सव २०२६ विषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की या उत्सवामध्ये सांस्कृतिक, तांत्रिक तसेच स्पोर्ट्स अशा विविध स्वरूपाच्या एकूण २४ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो आणि पुढील काळात तो अधिक वाढेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
देवस्थान पंच कमिटी विश्वस्त पशुपती माशाळ यांनी विद्यार्थिनींच्या कलागुणांना असाच वाव मिळावा अशी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रमोद मेणसे यांनी केले व आभार प्रदर्शन अंकाचे संपादक श्रीशैल मळेवाडी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.स्वयंप्रकाश व्यास प्रा. मंदाकिनी आसबे, प्रा. प्रीती केशेट्टी प्रा.गायत्री लंगोटे, प्रा. रोहिणी जमादार, प्रा. भाग्यश्री पाटील प्रा.रचना दुरशेट्टी , प्रा.रविकिरण पतंगे यांनी परिश्रम घेतले.






















