कुर्डूवाडी – आदिशक्ती शिक्षण संस्थेच्या वतीने आदर्श सैनिक स्कुलमध्ये उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक १० मीटर इंडोर राइफल शूटिंग रेंजचे उद्घाटन जी.व्ही.माळवणकरचँम्पियन सुवर्ण पदक विजेते यशवंत संजयमामा शिंदे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष मान प्राप्त झाला.
@ उद्घाटनानंतर त्यांनी शूटिंग रेंजची पाहणी करत सैनिक स्कूलच्या कॅडेट्सचा प्रॅक्टिकल स्कोर तपासला व त्यांच्या अचूकता, एकाग्रता आणि शिस्तीचे कौतुक केले. कॅडेट्सशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या दैनंदिन शेड्यूल, क्रीडा सराव, पी.टी. तसेच शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली.
कॅडेट्सचे स्पष्ट व्हिजन, स्टेज डेअरिंग आणि ज्ञानाचा व्यापक आवाका पाहून त्यांनी विशेष समाधान व्यक्त करत सांगितले की, “योग्य दिशेने केलेला सातत्यपूर्ण सराव आणि शिस्त हीच यशाची गुरुकिल्ली आहे.” तसेच त्यांनी आपल्या अनुभवातून क्रीडा क्षेत्रातील आव्हाने आणि संधी याविषयी मार्गदर्शन करत कॅडेट्सना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्यासाठी प्रेरित केले.
यावेळी त्यांनी कॅडेट्सना सल्ला दिला की, विविध राज्यांतून येऊन एकत्र राहण्याची संधी ही मोठी ताकद आहे. प्रत्येक राज्याची संस्कृती, परंपरा आणि विचार जाणून घेत स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा.
यानंतर त्यांनी संस्थेतील रोबोटिक्स लॅब, लायब्ररी, पीसीबी लॅब , फुटबॉल, बास्केटबॉल ग्राउंड आणि हॉर्स टेबलची पाहणी करून संस्थेच्या आधुनिक सुविधा व शैक्षणिक दर्जाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच अशा सुविधांमुळे विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी योग्य वातावरण मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अमोल सुरवसे, आर्किटेक्ट अजित पवार, सचिव दयानंद सुरवसे, एम.डी. पूजा सुरवसे, नगरसेवक प्रतिनिधी हरिचंद्र कांबळे, उद्योजक सिद्धेश्वर पाटील, प्रिन्सिपल बी .डी .राऊत सर, कोच आकाश गुजरे आणि क्रांती मॅडम यांची उपस्थिती होती.

























