अकलूज – अकलूज येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भरणाऱ्या घोडेबाजाराचे उद्घाटन दिवाळी पाडवा बुधवार दिनांक 22 रोजी सायंकाळी पाच वाजता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर आदीं मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदन सिंह मोहिते पाटील यांनी दिली.
घोडेबाजाराविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले अकलूज येथे मिळणाऱ्या सोयीसुविधा, सुरक्षा, खात्रीचे गिऱ्हाईक व पारदर्शी व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, बरेली, हरियाणासह संपूर्ण भारतातून मारवाड व पंजाब जातीचे 1200 देखणे, चपळ घोडे यावर्षी प्रत्यक्ष बाजाराच्या दोन महिने अगोदरच अकलूजमध्ये दाखल झाले आहेत. त्यापैकी २४ घोड्यांची विक्री होऊन २५ लाखांची उलाढाल सुद्धा झाली आहे.
येथील घोडे बाजाराला प्रत्यक्ष दीपावली पाडव्याला सुरुवात होते. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्यासाठी सुमारे १५ एकर जागा राखून ठेवली आहे. चारी बाजूंनी दगडी भिंतीच्या कंपाऊंड तसेच गर्द सावली देणाऱ्या चिंचेच्या झाडांची लागवड केली आहे. मागील १६ वर्षात ही झाडेही चांगलीच बहरली आहेत. त्यातून घोडे बांधण्यासाठी दावण आखली आहे. आत-बाहेर जाण्यासाठी प्रशस्त रस्ते, घोडे नाचवणे, पळवण्यासाठी विस्तीर्ण पटांगण ठेवले आहे. पाण्याची व विजेची २४ तास सोय तसेच शौचालय सुविधा आहे आहे.
बाजाराच्या आवारात मच्छर हटवण्यासाठी दररोज सायंकाळी फवारणी केली जाते. जनावरांच्या डॉक्टरांची सुविधा दिली जाते, तसेच घोड्यांच्या शृंगार साधनांच्या दुकानासाठी आणि व्यापाऱ्यांना चहापाणी, अल्पोपहारासाठी हॉटेलसाठीही भरपूर जागा जागा उपलब्ध करून दिली आहे. या घोड्यांना लागणारा सुका चारा, खुराकाची व्यापारी सोय करतात. मात्र शहरातील गरीब महिलांनी पुरवलेल्या गवतामुळे त्यांच्या ओल्या चाऱ्याची ही सोय होते. शिवाय या महिलांना रोजगारही उपलब्ध होत.
बाजारात घोड्याची विक्री झाल्यानंतर त्याच ठिकाणी खरेदी विक्री व्यवहाराच्या नोंदणीची अधिकृत संगणकीकृत पावती त्यांना दिली जाते. त्यावर घोड्यासह दोन्ही मालकांचे फोटो, वायद्याच्या तारखा नमूद असतात. अशा रितीने पारदर्शी व्यवहारासह बाजार आवारात सुरक्षेची सोय केली जाते. अकलूज मध्ये घोडे चोरून, पळवून नेणे, दमदाटी करणे आदी प्रकार घडत नाहीत. त्यामुळे अकलूजचा बाजार व्यापाऱ्यांना देशभरात सुरक्षित वाटतो. हा बाजार प्रत्यक्ष दिवाळी पाडव्याला सुरू होत असला तरी त्याअगोदरच व्यापारी घोडे घेऊन येतात. बाजार संपल्यावरही महिनाभर थांबतात. घोडेबाजारामुळे अकलूज मध्ये रोजगार निर्माण झाला आहे घोडे खरेदी विक्री करण्यासाठी लांबून व्यापारी व हौसे मंडळी येत असतात त्यामुळे अकलूज मधील हॉटेल्स लॉज यांचा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय होतो तसेच चारा विक्री मोठ्या प्रमाणावर होते