बार्शी – विद्यार्थ्यांनी अभ्यासा इतकेच खेळाला महत्व देत एकाग्रता आणि आत्मविश्वास अंगी बाळगला तर सहज विजय मिळवता येतो, असे उद्गार हिंदवी समाचारचे संपादक धिरज शेळके यांनी व्यक्त केले. यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सोजर इंग्लिश स्कूलच्या २६ ते २९ नोव्हेंबर या दरम्यान होणाऱ्या हिवाळी स्पर्धांचे उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका रिटा नेटके या उपस्थित होत्या. धिरज शेळके पुढे म्हणाले की, खेळात येणारे यश-अपयश पचविण्यासाठी अंगी खिलाडूवृत्ती असली पाहिजे. तसेच यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रिटा नेटके यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी स्पर्धेचे उद्घाटक धिरज शेळके यांना “कॅप्टन स्क्वॉड” च्यावतीने मानवंदना देण्यात आली. उद्घाटनप्रसंगी खेळ साहित्याचे पूजन करुन क्रीडा ज्योत प्रज्वलीत करण्यात आली. यावेळी शाळेचे शिक्षक प्रसाद सहस्रबुध्दे यांचे हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
२६ ते २९ नोव्हेंबर दरम्यान चालणाऱ्या या हिवाळी क्रीडा स्पर्धा भगतसिंग, सुखदेव, राजगुरु आणि वीर सावरकर अशा चार संघामध्ये खेळवल्या जाणार असून यामध्ये अनेक वैयक्तिक आणि सांघिक खेळ प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. याप्रसंगी अडथळ्यांच्या शर्यतीची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. तसेच संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच १७ वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्यांप्रती श्रद्धांजली अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक तुषार गदगी आणि अमृता शहा यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच क्रीडा प्रमुख दिपाली देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे सर्व शिक्षक बंधू-भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



















