सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात सुमारे १२ टक्केप्रमाणे ५० रूपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता दहावीसाठी ४२० रुपयांऐवजी ४७० रुपये, तर बारावीसाठी ४४० रुपयांऐवजी ४९० रुपये भरावे लागणार आहेत. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
यावर्षी अतिवृष्टी व महापुरामुळे राज्यातील नागरीक त्रस्त आहेत. सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामात पेरणी केल्यानंतर अतिवृष्टी, संततधार पाऊस व अनेक नदीला महापूर आले. त्यामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले . त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना राज्य परीक्षा मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ केल्याने शेतकर्यांच्या मुलांची अडचण वाढली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यात दरवर्षी फेब्रुवारी/मार्च महिन्यात दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसली तरी माध्यमिक विभागाकडून दहावी-बारावी परीक्षेच्या अनुषंगाने तयारीला वेग आला आहे. या परीक्षा शुल्कासोबतच विद्यार्थ्यांना प्रशासकीय शुल्क, गुणपत्रिका शुल्क, प्रमाणपत्र शुल्क, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क यासाठीही काही शुल्क भरावी लागणार आहे.
….
…..
परीक्षा शुल्क वाढीबाबत पुनर्विचार करावे
….
राज्यातील शेतकरी व नागरीक अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे आर्थिक संकटात असताना परीक्षा शुल्कात वाढ करणे योग्य नाही. राज्यातील विद्यार्थ्यांच्या आर्थिक परीस्थितीचा विचार न करता ५० रूपये परीक्षा शुल्क वाढविणे चुकीचे आहे. म्हणून परीक्षा मंडळाने परीक्षा शुल्क वाढीचा पुनर्विचार करावे.
रमेश पवार, पालक
…..
पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शुल्काबाबत संभ्रमावस्था
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात ५० रूपयांची वाढ केली आहे. मात्र जिल्ह्यातील पूरग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा माफीबाबत अद्याप निर्णय जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था दिसून येत आहे.



















