पुणे – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या महिन्याभरात बिबट्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पुणे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण व निमशहरी भागात त्यामुळे भीतीचे सावट आहे. पिंपरखेड, जांबूत, टाकळी हाजी, इनामगाव अशा भागांत बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत आहेत. या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देत वनमंत्री गणेश नाईक यांनी तात्काळ आणि परिणामकारक उपाययोजना राबवण्याचे आदेश द्यावेत,अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी (ता.१८) केली.
पुणे जिल्ह्यातील जून्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला तर, बिबट मानवी वस्त्यांमध्ये शिरल्याच्या अनेक घटना नोंदवण्यात आल्या आहेत.राज्यातील बिबट्यांची संख्या जवळपास दोन हजारांच्या घरात पोहचल्याने संवेदनशील भागांमध्ये वन्यजीव आणि मानव संघर्ष आखणी तीव्र होण्याची भीती आहे.मानव-वन्यजीव संघर्ष केवळ प्रशासनिक प्रश्न नाही; तो लोकांच्या सुरक्षेशी आणि वन्यजीव संवर्धनाशी संबंधित अत्यंत गंभीर विषय आहे.लोकांच्या जीविताचा प्रश्न उपस्थित असताना,सरकारी उपाययोजना कागदापुरत्या मर्यादित राहता कामा नयेत, असे पाटील म्हणाले.
राज्य सरकार आणि वन विभागाने काही उपायांची अंमलबजावणी सुरू केली असली तरी ती अपुरी असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. सर्व संवेदनशील गावांमध्ये एआय सेन्सर आधारित चेतावणी यंत्रणा तातडीने बसवावेत, बिबट्यांची संख्या नियंत्रणासाठी वैज्ञानिक नसबंदी कार्यक्रम लागू करावा,नवीन निवारा केंद्रे व रिहॅबिलिटेशन युनिट्स तातडीने कार्यान्वित करावीत, शेती आणि वस्ती सीमांवर प्रकाशयोजना, गस्ती आणि मोबाइल अलर्ट प्रणाली सुरू करावी, अशी मागणी पाटील यांनी यानिमित्ताने केली.



















