तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली. यामध्ये मंत्रिमंडळातील खातेबदल करत आधीचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी करण्यात आली. यानंतर त्यांना क्रीडा खात्याची जबाबदारी दिली आहे.
कृषी खाते दत्ता मामा भरणेकडे यांच्याकडे देण्यात आले आहे. विधानसभेत वादग्रस्त विधानं आणि विधानसभा अधिवेशनात रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्याने कोकाटे सतत चर्चेत होते. अखेर या प्रकरणाला पूर्णविराम देत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, राजकीय वर्तुळात याला मोठा धक्का मानला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलत असताना म्हणाले, जी घटना घडली त्याविषयी लोकांमध्ये मोठा रोष होता. त्या संदर्भात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. आणि त्यानंतरच कोकाटेंचे खाते बदलण्याचा निर्णय घेतला. यानंतर कृषी खात्याची धुरा आता भरणे मामा यांच्याकडे सोपवली आहे. या व्यतिरिक्त इतर कोणताही खातेबदल होणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, मंत्रिमंडळातील कोणीही बेशिस्त वर्तन केल्यास ते सहन केलं जाणार नाही. कारवाई होईल, हा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. जनता आपले बोलणं, वागणं आणि वर्तन यावर बारकाईने लक्ष ठेवून असते, त्यामुळे प्रत्येक मंत्र्याने जबाबदारीनं वागणं पाहिजे, असं त्यांनी ठणकावून सांगितले.